‘दॅट 70s शो’ फेम हॉलिवूड अभिनेता डॅनी मास्टरसनला दोन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने ३० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २० वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात न्यायलयाने गुरुवारी(८ सप्टेंबर) अंतिम निकाल देत मास्टरसनला ही शिक्षा सुनावली. मे महिन्यात मास्टरसनला या प्रकरणात दोषी ठरविण्यात आलं होतं. तेव्हापासून तो पोलीस कोठडीत होता.
४७ वर्षीय मास्टरसनवर पीडित महिलांनी दारू पाजून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. दारू पाजल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत बलात्कार केल्याचं पीडित महिलांनी म्हटलं होतं. २००३ साली प्रकरणात मास्टरसनला दोषी ठरविण्यात आलं होतं. मीटू प्रकरणातही त्याचं नाव पुढे आलं होतं. पीडित महिलांनी मास्टरसनवर अनेक गंभीर आरोप लावले होते.
“मिस्टर मास्टरसन पीडित महिलांसाठी हा खूप कठीण काळ राहिला आहे. डॅनी मास्टरसनला २० वर्षांपूर्वी दोन महिलांवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत ३० वर्षांच्या कारावसाची शिक्षा सुनावण्यात येत आहे,” असं न्यायाधीशांनी मास्टरसनला शिक्षा सुनावताना म्हटलं आहे. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होत असताना साक्ष देणाऱ्या महिलेने मास्टरसनवर आरोप केले आहेत. “याच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत नाही. तुला शिक्षा होणार हे मला माहीत होतं. मला खूप दु:ख वाटत आहे. मी हे सगळं आधीच पोलिसांना सांगायला हवं होतं,” असं पीडित महिलेने म्हटलं.