वैवाहिक जीवनात काही अडचणी निर्माण झाल्यानंतर अनेक जोडपी कायदेशीररित्या विभक्त होतात. त्यांच्या विभक्त होण्यामागे अनेक कारणं असतात. मात्र, सध्या प्रसिद्ध हॉलिवूड (hollywood) अभिनेता सिलवेस्टर स्टॅलोन आणि त्याची पत्नी जेनिफर फ्लाविन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. एका पाळीव श्वानावरुन या जोडीमध्ये वाद झाला असून त्यांनी थेट कोर्टाची पायरी चढली आहे.
सिलवेस्टर स्टॅलोन (sylvester stallone) आणि जेनिफर फ्लाविन (jennifer flavin) ही जोडी लग्नाच्या २५ वर्षांनंतर घटस्फोट घेणार आहेत. १९ ऑगस्ट रोजी त्यांनी पाल्म बीच काऊंटी येथे कायदेशीरित्या विभक्त होण्यासाठी अर्ज केला.
पाळीव श्वान ठरला घटस्फोटाचं कारण
सूत्रांच्या माहितीनुसार, स्टॅलोन आणि फ्लाविन यांच्यात रॉटव्हिलर या पाळीव श्वानावरुन वाद झाला. स्टॅलोन यांना पाळीव श्वानांची विशेष आवड असल्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच प्रजातीचे वेगवेगळे श्वान आहेत. मात्र, तरीदेखील कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आणखी एक रॉटव्हिलर प्रजातीचा श्वान घरात असावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र, घरात नवीन कुत्रा नको असं जेनिफरने सांगितलं होतं. मात्र, जेनिफरने नकार दिल्यानंतरही स्टॅलोनने घरी रॉटव्हिलरला आणलं. ज्यामुळे त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं.
दरम्यान, स्टॅलोन आणि जेनिफर यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विभक्त होण्यापूर्वी एकमेकांशी चर्चा करुन ते वाद सोडवणार होते. मात्र, हा वाद मिटला नाही. त्यामुळे लग्नाच्या २५ वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याच निर्णय घेतला.
जेनिफर, स्टॅलोनपेक्षा वयाने २२ वर्षाने लहान असून हॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जात होत. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्तानंतर साऱ्यांनाच धक्का बसला आहे.