हॉलिवूडला हादरवणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्कर विजेता अभिनेता जीन हॅकमन त्यांची पत्नी बेट्सी अराकावासोबत मृतावस्थेत आढळले. न्यू मॅक्सिको येथील राहत्या घरातच त्यांचे मृतदेह आढळले आहेत. त्यांच्या संशयास्पद मृत्यूने हॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
जीन हॅकमन हे ९५ वर्षांचे होते तर त्यांची पत्नी ६४ वर्षांची होती. बुधवारी(२६ फेब्रुवारी) दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास त्यांचे मृतदेह आढळले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जीन हॅकमन आणि त्यांच्या पत्नीसोबत घरातील कुत्रादेखील मृतावस्थेत आढळला आहे.
जीन हॅकमन यांनी जवळपास ८०हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. १९६० पासून त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. अनेक टीव्ही शोमध्येही ते दिसले होते. द फ्रेंच कनेक्शन या सिनेमासाठी त्यांना ऑस्करचा पुरस्कार मिळाला होता. या सिनेमात त्यांनी पोपेय डॉयलची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.