हॉलिवूड अभिनेता अभिनेता चॅडविक बॉसमन याचे शुक्रवारी निधन झाले. मार्व्हल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पॅथर’ सिनेमात साकारणारा चॅडविक ४३ वर्षांचा होता आणि गेल्या ४ वर्षांपासून कॅन्सरने पीडित होता. चॅडविकच्या निधनाचे वृत्त ऐकून त्याच्या चाहत्यांना शोक अनावर झाला. जगभर शोककळा पसरली. जगभरातील चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. चॅडविक या जगातून गेला पण जाता जाता इतिहास रचून गेला. त्याच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेले शेवटचे ट्विट ट्विटरच्या इतिहासातील सर्वाधिक लाईक मिळवणारे ट्विट ठरले.
ट्विटरने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत ही माहिती दिली. चॅडविकच्या या ट्विटला आतापर्यंत 70 लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच २३ लाखांपेक्षा अधिक नेटक-यांनी यावर कमेंट दिल्या आहेत. 31 लाखांपेक्षा अधिक वेळा हे ट्विट रिट्विट केले गेले.
टिष्ट्वटरच्या इतिहासातील सर्वाधिक लाईक मिळवणा-या या ट्विटमध्ये चॅडविकचा एक हसरा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो आहे. सोबत एक नोट आहे. या नोटमध्ये त्याच्या निधनाची माहिती दिली गेली आहे. 2016 मध्ये चॅडविकला तिस-या स्टेजचा कॅन्सर असल्याचे निदान झाले होते, अशी माहितीही या नोटमध्ये देण्यात आली आहे.चॅडविक गेल्या 4 वर्षांपासून कॅन्सरला झुंज देत होता. चॅडविकने त्याच्या करिअरमध्ये ‘42’ आणि ‘Get on Up’ सारख्या सिनेमातून आपली जागा निर्माण केली. 2018 मध्ये आलेल्या मार्व्हलच्या ब्लॅक पँथरमध्ये टि-चालाची भूमिका साकारून तो जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उरतला होता. त्यानंतर तो एव्हेंजर्स इनफिनिटी वॉर आणि एव्हेंजर्स-एंड गेमसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमातही ब्लॅक पँथरच्या भूमिकेत दिसला. त्याचा शेवटचा सिनेमा Da 5 Bloods याचवर्षी रिलीज झाला होता.