लोकप्रिय अमेरिकन टीव्ही शो ‘फ्रेंड्स’मध्ये चँडलरची भूमिका साकारणारे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाले होते. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. लॉस एंजेलिस येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह घरातील हॉट टबमध्ये बुडालेल्या अवस्थेत आढळून आला होता. मॅथ्यू पेरी हे भारतातही खूप लोकप्रिय आहेत. अशातच आता एक बातमी समोर येत आहे लॉस एंजेलिसमधील मॅथ्यू पेरी यांचे घर एका भारतीयाने खरेदी केले आहे.
लॉस एंजेलिसमधील ज्या घरामध्ये मॅथ्यू पेरी यांचा मृत्यू झाला, तेच घर भारतीय वंशाच्या रिअल इस्टेट डेव्हलपर आणि चित्रपट निर्माती असलेल्या अनिता वर्मा-लालियनने खरेदी केलं आहे. विशेष म्हणजे तिने हे घर 8.55 दशलक्ष डॉलर म्हणजेच 72.04 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. घर विकत घेतल्यानंतर तिने हिंदू पद्धतीनुसार खास पूजा केली. या पुजेचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या आलिशान घराचे नवीन फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत,
अनिताने पोस्टमध्ये लिहलं, 'सांगताना खूप आनंद होतोय की आम्ही या महिन्याच्या सुरुवातीला लॉस एंजेलिसमध्ये घर खरेदी केले आहे. आमच्या एजंटने सांगितले की त्यांच्याकडे एक अद्भुत 'ऑफ-मार्केट' मालमत्ता आहे. ज्या क्षणी मी घरात प्रवेश केला, तेव्हाच मी घराच्या प्रेमात पडले. विशेषत: घरातून पॅसिफिक महासागर दिसतो. त्यामुळे घर विकत घेण्याचा निर्णय घेतला".
अनिताने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'एक रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून माझा विश्वास आहे की प्रत्येक मालमत्तेचा एक इतिहास असतो. प्रत्येक घरामध्ये एक ऊर्जा असते, जी घराचा मालक निर्माण करतो. मी हिंदू आहे. त्यामुळे नवीन घर खरेदी केल्यावर पूजा करण्याची परंपरा आहे. आमचे ॲरिझोना येथील पंडितजी आशीर्वाद देण्यासाठी घरी आले". मॅथ्यू पेरीच्या घरातील काही गोष्टी बदलणार नसल्याचंही तिने स्पष्ट केलंय.
पुढे तिने लिहलं, "घर खरेदी करण्याच्या निर्णयाचा पूर्वीच्या मालकाशी काहीही संबंध नाही. हे घर आवडल्याने ते खरेदी करण्याचा निर्णय घेतला. घराच्या जुन्या मालकाच्या काही सकारात्मक गोष्टी आम्ही तशाच ठेवणार आहोत. त्या व्यक्तीने आपल्या प्रतिभिने अनेकांच्या आयुष्यात हास्य आणलं होतं. हे घर म्हणजे आमच्यासाठी परफेक्ट व्हेकेशन होम असेल. इथे नव्या आठवणी बनवण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत". 3500 चौरस फूटांवर पसरलेला हा बंगला आहे.मॅथ्यू पेरी यांनी हे घर 2020 मध्ये हे घर 6 दशलक्ष डॉलर म्हणजेच 50.5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.