Join us

कोरोनामुळे झाला बहिणीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू, अंत्यसंस्कार करण्यासाठी अभिनेता भाऊ मागतोय मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 4:19 PM

व्हिडिओत हा अभिनेता दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या आपल्या बहिणाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांकडून मदत मागताना दिसत आहे.

ठळक मुद्देलूका फ्रेंजी या अभिनेत्याच्या बहिणाचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. पण अंत्यसंस्कार करण्याची कोणतीच सोय नसल्याने तिचा मृतदेह त्याने गेल्या दोन दिवसांपासून घरातच ठेवला आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात आपलं थैमान घातले आहे. जगभरात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या सगळ्यात आता एक हृद्रयद्रावक व्हिडिओ जगाच्या समोर आला आहे. या व्हिडिओत एक भाऊ दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या आपल्या बहिणाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांकडून मदत मागताना दिसत आहे. हा भाऊ एक प्रसिद्ध अभिनेता असून इटलीतील आपल्या घरातून त्याने हा व्हिडिओ बनवला आहे.

लूका फ्रेंजी या अभिनेत्याच्या बहिणाचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. पण अंत्यसंस्कार करण्याची कोणतीच सोय नसल्याने तिचा मृतदेह त्याने गेल्या दोन दिवसांपासून घरातच ठेवला आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात तो सांगत आहे की, मी काय करू हेच मला कळत नाहीये... मला सध्या सगळ्यांपासून वेगळे करण्यात आले असल्याने मी बहिणीचे अंत्यसंस्कार देखील करू शकत नाहीये. मी अनेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच माझ्या मदतीसाठी आलं नाही. मला कोणीच मदत करायला तयार नसल्याने माझ्या बहिणीचे अंत्यसंस्कार करता येते नाहीये.

व्हिडिओमध्ये त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या बेडवर आपल्याला त्याच्या बहिणीचा मृतदेह पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये म्हणून लूका आणि त्याच्या परिवाराला वेगळे ठेवण्यात आले आहे. लूका त्याच्या बहिणीच्या मृतदेहासोबत दोन दिवसांपासून असून त्याला देखील कोरोना झाला असल्याची शंका त्याला वाटत आहे. 

लूकाने इटलीमधील गुमराह या टेलिव्हिजन शो मध्ये काम केले आहे. लूकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर इटलीमधील अधिकाऱ्यांनी त्याच्या बहिणीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला मदत केली असली तरी अंत्यसंस्काराला हजर राहाण्यास कुटुंबियातील कोणालाच परवानगी देण्यात आली नसल्याचे म्हटले जात आहे. 

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या