Join us  

​जॅकी चॅन यांचे स्वप्न सत्यात...डझनावर हाडे मोडल्यानंतर मिळाला आॅस्कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2016 2:28 PM

आपल्या ५६ वर्षांच्या कारकिर्दीत २०० पेक्षा अधिक चित्रपट करणारा चीनी अभिनेता जॅकी चॅन यांना आॅस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

आपल्या ५६ वर्षांच्या कारकिर्दीत २०० पेक्षा अधिक चित्रपट करणारा चीनी अभिनेता जॅकी चॅन यांना आॅस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवारी रात्री लॉस एंजिल्सच्या हॉलिवूड अ‍ॅण्ड हिंगलँड सेंटरमध्ये आयोजित आठव्या ‘अ‍ॅन्युअल गवर्नर्स अवार्ड्स’ सोहळ्यात अ‍ॅक्शन-कॉमेडी सिनेमांमधील योगदानासाठी जॅकी चॅन यांना आॅनरेरी आॅस्कर देऊन सन्मानित करण्यात आले.  जॅकी चॅन यांना टॉम हॅक्स, रश आॅवर या सिनेमांमध्ये त्यांच्यासोबत झळकलेले अभिनेते क्रिस टकर आणि पुलिस स्टोरी-3 फेम अभिनेत्री मिखेल योह यांनी सन्मानित केले. आॅस्करने सन्मानित करण्यात आल्यानंतर जॅकी चॅन अतिशय भावूक झालेत.  मी 23 वर्षांपूर्वी आॅस्कर अवॉर्डचे स्वप्न पाहिले होते. त्याकाळात मी अ‍ॅक्शन स्टार सिल्वेस्टर स्टेलोन यांच्या घरी गेलो होते, तेथे पहिल्यांदा आॅस्करची ट्रॉफी पाहिली होती. तेव्हापासून हा पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न मी उराशी बाळगले होते. माझी अनेक हाडे मोडल्यानंतर मला हा सन्मान प्राप्त झाला. माझे वडील मला नेहमी विचारायचे, की तू जगभरातील एवढ्या सिनेमांमध्ये काम केले, अनेक अवॉर्ड्स मिळाले, मात्र तुला आॅस्कर कधी मिळणार. मी त्यांना म्हणालो होतो, की मी केवळ अ‍ॅक्शन आणि कॉमेडी सिनेमे बनवतो. मी पहिला सिनेमा केला, तेव्हा माझे वय केवळ सहा वर्षे होते. या 56 वर्षांत मी 200 हून अधिक सिनेमे केले आणि अ‍ॅक्शन करताना माझी डझनहून अधिक हाडे मोडली आहे, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.थँक यू हॉलिवूड अ‍ॅण्ड थँक्यू हाँगकाँग!‘थँक यू हॉलिवूड’अशा शब्दांत जॅकी यांनी हॉलिवूडचे आभार मानले. इतक्या वर्षांत मला खूप काही शिकवल्याबद्दल धन्यवाद. मी आॅस्करला स्पर्श केला, त्याचे चुंबन घेतले, त्याचा सहवास अनुभवला. तुम्हाला आतासुद्धा त्यावर माझे हाताचे ठसे मिळतील.  अकॅडमी अवार्ड्सचे अध्यक्ष चेरल बून इसाक्स यांनी आॅनरेरी आॅस्करसाठी मला फोन केला, तेव्हा मी त्यांना तुम्ही नक्की शुअर आहात ना? असा प्रश्न केला होता. कारण त्यांचे शब्द ऐकून माझा माझ्या कानावर विश्वास बसेना, असे ते म्हणाले. जॅकी चॅन यांनी हाँगकाँगलाही धन्यवाद दिले. या शहरामुळे आणि या शहरातील लोकांमुळे मी आज याठिकाणी आहे. मी चीनी असल्याचा मला गर्व आहे, असे ते म्हणाले.जॅकी चॅन यांचा ‘कुंग-फू योगा’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री दिशा पाटणी, अमायरा दस्तूर यांच्या मुख्य भूमिका आहे. या चित्रपटातील एक गाणे फराह खान हिने कोरिओग्राफ केले आहे. ‘कुंग-फू योगा’ हा चित्रपट भारत-चीन मनोरंजन योजनेचा भाग आहे. भारत व चीन यांच्यात तीन चित्रपट बनवण्याचा करार झाला होता. त्याअंतर्गत जॅकी चॅनची मुख्य भूमिका असलेला ‘कुंग-फू योगा’ हा चित्रपट येत्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅकी चॅन आपल्या चित्रपटातील बहुतांश स्टंट स्वत: करतात. या धोकादायक स्टंटमुळे चॅन यांना विमा काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ‘मोस्ट स्टंट्स बाय ए लिव्हिंग अ‍ॅक्टर’ म्हणून त्यांचे नाव गिनीज व्लर्ड रेकॉर्डमध्ये सामील आहे. याशिवाय एका चित्रपटात केवळ एका शॉटसाठी सर्वाधिक टेक घेण्याचा एक अनोखा रेकॉर्डही त्यांच्या नावावर आहे. या शॉटसाठी चॅन यांनी २९०० पेक्षा अधिक रिटेक घेतले. स्टंट करताना जॅकी चॅन अनेकदा जखमी झाले आहेत. ‘आर्मर आॅफ गॉड’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते एका झाडावरून पडले. यात ते गंभीर जखमी झाले होते.