जबदस्त मारधाड, उत्कंठा वाढवणारा सस्पेन्स, एकापेक्षा एक दिग्गज कलाकार, उत्तम कथानक यामुळे जेम्स बॉन्ड (James Bond) फ्रान्चायजीच्या सिनेमांनी इतके वर्ष जगभरातील प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आजही हे सिनेमे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत वेळोवेळी ते हे सिनेमे बघत असतात. आता तर जेम्स बॉन्ड सिनेमांच्या फॅन्ससाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. कारण ते कधीही 'जेम्स बॉन्ड' सीरीज कोणतेही सिनेमे कधीही एका क्लिकवर बघू शकतात.
जगभरात आपल्या दमदार कथानकांसाठी आणि अॅक्शन सीन्ससाठी लोकप्रिय असलेली 'जेम्स बॉन्ड' फ्रांचायजीचे सगळे सिनेमे तुम्ही आता तुमच्या मोबाइलवर एका क्लिकमध्ये बघू शकणार आहात. ओटीटी प्राइम व्हिडीओने जेम्स बॉन्डचे सिनेमे म्हणजे १९६२ मध्ये रिलीज झालेला 'डॉ.नो' पासून ते २०१५ मध्ये आलेला 'स्पेक्टर' हे सगळे सिनेमे आपल्या प्लॅटफॉर्म रिलीज केले आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे सगळे तुम्ही हिंदी भाषेतही बघू शकता. ओटीटीच्या प्रेक्षकांसाठी हे या वर्षातील सर्वात मोठं गिफ्ट मानलं जात आहे.
याच वर्षी मे महिन्या जगातल्या दोन मोठ्या कंपन्यांची एक डील झाली आणि त्याअंतर्गत 'जेम्स बॉन्ड'चे प्रसारणाचे मालकी असलेली कंपनी एमजीएम स्टुडिओचे मालकी हक्क अॅमेझॉनजवळ आले. ८.४५ अरब डॉलरमध्ये झालेली ही डील पूर्ण झाल्यावर आता जेम्स बॉन्डचे सगळे सिनेमे अॅमेझॉनवर आले आहेत. एमजीएम स्टुडिओची स्थापना मारकस लोए आणि लुईस बी मेअर यांनी १७ एप्रिल १९२४ मध्ये केली होती.
अॅमेझॉनने आपल्या ओटीटी प्राइम व्हिडीओ ग्राहकांची संख्या नेटफ्लिक्सपेक्षा पुढे नेण्यासाठी आक्रामक रणनीति आखली आहे. त्यानुसार यावर्षी काम केलं गेलं. पण भारतातील त्यांचा प्रवास जरा वादग्रस्त ठरला. दर्जा नसलेले सिनेमे जास्त किंमतीत विकत घेतल्याने कायदेशीर कारवाईमुळे या कंपनीला वादाचा सामना करावा लागला होता. पण आता जेम्स बॉन्ड सीरीजच प्राइम व्हिडीओवर आल्याने स्थिती सुधारू शकते.
एमजीएम स्टुडिओने इतक्या वर्षात साधारण ४ हजार सिनेमे बनवले. यातील १८० सिनेमांनी ऑस्कर जिंकले आहेत. एमजीएम स्टुडिओकडे चांगल्या टीव्ही मालिकाही आहेत. या मालिकांनी १०० एमी पुरस्कारही जिंकले आहेत. एमजीएम कंपनीकडे अनेक अॅनीमेशन सिनेमांच्या अधिकारांशिवाय जेम्स बॉन्ड सिनेमांचे प्रसारणाचे, प्रदर्शनाचे आणि वितरणाचे अधिकारही आहेत.