2009 मध्ये एक सिनेमा आला आणि या सिनेमानं अख्ख्या जगाला वेड लावलं. या एका चित्रपटानं सिनेजगताची व्याख्याचं बदलवून टाकली. प्रतिसाद इतका अभूतपूर्व की, जगभरात या सिनेमां 18,957 कोटींची कमाई करत नवा इतिहास रचला. आम्ही बोलतोय ते दिग्दर्शक जेम्स कॅमेरूनच्या (James Cameron) जगभर गाजलेल्या ‘अवतार’ या चित्रपटाबद्दल. तुम्हीही या चित्रपटाचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, गेल्या 13 वर्षांपासून सिनेप्रेमी ‘अवतार’च्या सीक्वलची प्रतीक्षा करत होते. अखेर या सीक्वलची घोषणा झालीये. ‘अवतार 2’ (Avatar 2 ) येतोय आणि केवळ इतकंच नाही तर या सीक्वलची झलकही समोर आली आहे.
‘ Avatar: The Way of Water’ या नावानं 16 डिसेंबर 2022 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हा रिलीज होणार आहे. खास गोष्ट म्हणजे हा सिनेमा एक-दोन नाही तर जगभरातील तब्बल 160 भाषांमध्ये प्रदर्शित होतोय. या चित्रपटात पुन्हा एकदा प्रेक्षकांना चित्तथरारक व्हिज्युअल इफेक्टची ट्रिट मिळणार आहे.
दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी सोशल मीडियावर बहुप्रतिक्षित ‘अवतार 2’चं पोस्टर रिलीज केलं आहे. यापैकी एका फोटोमध्ये, जेम्स पहिल्या चित्रपटात दिसलेल्या ड्रॅगन गनशिपच्या फ्लाइट डेकवर एडी फाल्कोच्या जनरल आर्डमोरसोबत उभा असलेला दिसत आहे. त्याचवेळी, चित्रपटाच्या सिक्वेलचं सर्व शूट पाण्याखाली केलं जाणार असल्याचं मानलं जातंय.
‘अवतार’ सर्वात महागडा अन् सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट2009 मध्ये ‘अवतार’ रिलीज झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अगदी या चित्रपटानं ‘टायटॅनिक’लाही मागे टाकलं होतं. अवघ्या सहा आठवड्यांत ‘अवतार’नं 1 अब्ज 85 डॉलरची कमाई केली होती. ‘अवतार’ला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते. आॅस्करसाठी देखील या चित्रपटाला नामांकन मिळालं आहे. हा चित्रपट 23 कोटी डॉलरच्या बजेटमध्ये बनवला गेला होता, ज्याला तेव्हाचा सर्वात महागडा चित्रपट म्हटलं गेलं होतं.
आणखीही पार्ट येणार...‘अवतार 2’चं शूटिंग सप्टेंबर 2020 मध्ये पूर्ण झालं. त्याचबरोबर ‘अवतार 3’चं शूटिंगही जवळपास संपलं आहे. ‘अवतार 2’ हा 16 डिसेंबर 2022 रोजी रिलीज होतोय. ‘अवतार 3’साठी 20 डिसेंबर 2024 चा स्लॉट निश्चित करण्यात आला आहे. यानंतर ‘अवतार 4’ डिसेंबर 2026 आणि ‘अवतार 5’ डिसेंबर 2028 ला रिलीज होण्याची अपेक्षा आहे.