जगात सर्वात जास्त चर्चेत राहिलेलं किंवा अजूनही चर्चेत राहणारं जहाज म्हणजे टायटॅनिक. टायटॅनिक सिनेमा पाहिला नसलेला क्वचितच एखादा सापडेल. हा सिनेमा बघण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे यातील लव्हस्टोरी आणि दुसरं म्हणजे एवढं मोठं जहाज पाण्यात बुडालं कसं हे जाणून घेण्याची उत्सुकता.
जेम्स कॅमरूनचा टायटॅनिक सिनेमा सर्वाधिक चर्चेत राहिला. केट विंसलेट आणि लिओनार्डो डिकॅप्रियो स्टार असलेला हा सिनेमा १ नोव्हेंबर १९९७ ला रिलीज झाला होता. सिनेमाने कमाईबरोबरच पुरस्कारांची रांग लावली होती. सत्य घटनेवर आधारित सिनेमाचे एकूण बजेट त्याकाळी जवळपास १२५० कोटी रुपये होते. यातून झालेली कमाई जवळपास १४ हजार कोटी होती.
टायटॅनिकमधील केटच्या अभिनयाची आाणि तिच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा रंगली होती. या चित्रपटाने केटला जगभरात लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटाने केटला सुपरस्टार बनवले. पण या चित्रपटाच्या यशानंतर तिच्यावर टीका करण्यात आली होती. केटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण टायटॅनिक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी माझ्याबद्दल खूप विचार करायला लागली होती. माझ्यासाठी दिवस-रात्र सगळं काही एकच असायचे. माझ्यावर ब्रिटिश मीडियाकडून प्रचंड टीका करण्यात आली होती. मला सगळ्याच बाजूने घाबरवण्यात आले होते. पण हे दिवस जातील याची मला खात्री होती.
पुढे केट सांगते, खरं सांगू तर मी त्या प्रसिद्धीसाठी तेव्हा तयार देखील नव्हते. पण मला मिळालेल्या प्रसिद्धीने हुरळून न जाता मी माझा अभिनय अधिकाधिक चांगल्याप्रकारे बनवण्यासाठी मेहनत घेत होती. मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायच्या होत्या आणि त्यासाठी मी प्रचंड मेहनत करण्यास तयार होती.