प्रसिद्ध दक्षिण कोरियन अभिनेत्री पार्क सू र्युन ( Park Soo Ryun )हिचं निधन झालं आहे. घरी जात असताना पायऱ्यांवरुन तिचा पाय घसरला आणि ती खाली कोसळली. यामध्येच तिचं निधन झाल्याचं सांगण्यात येत. वयाच्या २९ व्या वर्षी पार्क सू र्युन हिची प्राणज्योत मालवल्यामुळे चाहत्यांसह कोरियन फिल्म इंडस्ट्रीलाही जबर धक्का बसला आहे.
पार्क सू र्युन ही ११ जून रोजी तिच्या घरी जात होती. यावेळी घराच्या पायऱ्या चढत असताना तिचा पाय घसरला. परिणामी, तिला प्रचंड मार लागला. पार्क सू र्युन पडल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. पार्क सू र्युन हिचा १२ जून रोजी जेजू बेटावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच तिचं निधन झालं.
पार्क सू र्युन हिच्या कुटुंबियांनी घेतला मोठा निर्णय
पार्कचं निधन झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी तिच्या आईने महत्त्वाची माहिती दिली. "फक्त तिचा मेंदू बेशुद्ध अवस्थेत आहे, मात्र,तिचं हृदय अजूनही सुरु आहे. कोणीतरी असावं ज्याला (अवयवांची) नितांत गरज आहे. तिचं हृदय कोणाच्या तरी शरीरात धडधडतंय हे पाहून तिचे आई-वडील म्हणून आम्हीदेखील समाधानी असू, असं तिच्या आईने म्हटलं. दरम्यान, पार्क सू र्युन ही प्रसिद्ध कोरियन अभिनेत्री आहे. ती खासकरुन 'स्नोड्रॉप' , 'द डेज वी लव्हड' आणि 'सिद्धार्थ' यांच्यासाठी लोकप्रिय होती.