'गेम ऑफ थ्रोन्स' या वेब सीरिजचे निर्माते लिन ची यांची हत्या करण्यात आली आहे. लिन ची यांच्या निधनाने सर्वत्रच खळबळ माजली आहे. ख्रिसमसच्याच दिवशी लिन ची यांची हत्या करण्यात आली. लिन ची यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. त्यांना चहामधून विष देण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शंघाय पोलिसांनी लिन ची यांचे सहकारी जू याओ यांच्यावर संशय घेतला असून यावर अधिक तपास सुरु आहे. लिन हे अवघ्या ३९ वर्षांचे होते. विशेष म्हणजे चायनाच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये लिन ची यांचा समावेश आहे. गेमिंग क्षेत्रात लिन ची जगप्रसिद्ध नाव होते. अल्पावधीतच त्यांनी या क्षेत्रात यश मिळवले होते. आज लिन ची यांची एकूण संपत्ती जवळजवळ 6.8 बिलियन युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 76 अरब 60 करोड़ रुपये एवढी आहे. लिन यांची हत्या त्यांच्या संपत्तीमुळे झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत पोलिसांचा अधिक तपास सध्या सुरू आहे.
लिन ची चीनमधील गेमिंग क्षेत्रातल्या सर्वात नावाजलेल्या व्यक्तींपैकी एक होते. सिनेक्षेत्रात मिळालेल्या यशानंतर त्यांना गेमिंग क्षेत्रातही भरघोस यश मिळाले. दिवसेंदिवस यशोशिखरावर असताना 2009 मध्ये त्यांनी 'याझु' नावाची कंपनीची सुरूवात केली. दरम्यानच्या काळात मोबाईल गेमिंग क्षेत्रातही त्यांनी उत्तम कामगीरी करत यश मिळवले.
बघता - बघता याझु कंपनी केवळ चीनपुरतीच मर्यादित न राहात आशिया, युरोप आणि अमेरिकेतही सुरू करण्यात आली. गेम ऑफ थ्रोन्स या वेब सीरिजचे ते डेव्हलपर म्हणूनच जगभरात त्यांना ओळखले जात होते.