अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आगीचा कहर अजूनही सुरूच आहे. लॉस एंजलिस व अन्य काही ठिकाणी लागलेली आग प्रचंड भडकली आहे. या आगीमुळे २ लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉस एंजलिसमध्ये वणव्यांमुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. हॉलिवूड हिल्स परिसरालाही त्याची धग जाणवत आहे.
लॉस एंजेलिस हे हॉलिवूडसेलिब्रिटींचे (Hollywood Hills) घर म्हणून ओळखले जाते. सध्याच्या आगीच्या वणव्यामुळे हॉलिवूडसाठी हे मोठे नुकसान मानले जात आहे. लॉस एंजेलिस हे दक्षिण कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर आहे. हे अमेरिकेतील चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे केंद्र आहे.
आगीमुळे गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याचा उत्साह थंडावला. "बेटर मॅन" आणि "द लास्ट शोगर्ल" चे प्रीमियर देखील रद्द करण्यात आले. स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड अवॉर्ड्सची नामांकने थेट कार्यक्रमाऐवजी प्रेस रिलीजद्वारे जाहीर करण्यात आली. एवढंच काय तर ऑस्कर नामांकने देखील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहेत. ऑस्कर २०२५ च्या नामांकनांची घोषणा देखील १७ जानेवारी ऐवजी १९ जानेवारी करण्यात आली आहे.
भीषण आगीमुळे हॉलिवूड स्टार्सचे बंगले जळून खाक झाले आहेत. या भीषण आगीत प्रसिद्ध अभिनेता बिली क्रिस्टल आणि त्यांची पत्नी जॅनिस यांचे पालिसेड्स येथील ४५ वर्षे जुने घर उद्ध्वस्त झाले आहे. १९७९ पासून ते या घरात राहत होते. तसेच मंडी मूर आणि पेरिस हिल्टन यांच्यासह विविध सेलिब्रिटीची घरे जळाल्याची माहिती आहे.