सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री आणि मॉडेल सर्जरी केल्याचं अनेकदा समोर आलेलं आहे. पण, अशीच सर्जरी करणं एका ३१ वर्षीय मॉडेलच्या जीवावर बेतलं आहे. बारीक होण्यासाठी केलेल्या लिपोसक्शन सर्जरीने मॉडेलचा मृत्यू झाला आहे. मॅक्सिकन मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर एलेना लॅरिया हिच्या निधनाची बातमी समोर आली आहे. मंगळवारी(१९ मार्च) एलेनाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
बारीक होण्यासाठी लिपोसक्शन सर्जरी केल्यानंतर अनेकदा पल्मनरी थ्रोबोंसिसची समस्या उद्भवते. ज्यामुळे फुप्फुसात रक्ताच्या गाठी तयार होतात. त्यामुळे लिपोसक्शन सर्जरीनंतर अनेकदा रुग्णांचा मृत्यू होतो. एलेनाच्या बाबतीतही हेच घडल्याची माहिती एनडीटीव्हीने दिली आहे. लिपोसक्शन सर्जरीनंतर पल्मनरी थ्रोबोंसिसमुळे फुप्फुसात गाठी होऊन एलेनाचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावरुन पोस्टद्वारे एलेनाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे.
एलेना सोशल मीडियावर हॉर्स गर्ल म्हणून ओळखली जायची. ती प्राणीप्रेमी होती. तिने प्राण्यांच्या हक्कासाठी कुआरोलँडिया ही संस्थाही सुरू केली होती. याच संस्थेच्या पेजवरुन एलेनाच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.