Join us  

मायकल जॅक्सनच्या भावाचं ७०व्या वर्षी निधन, रोड ट्रिपमध्येच आला हृदयविकाराचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 9:39 AM

मायकल जॅक्सनच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मायकलचा भाऊ टिटो जॅक्सन यांचं ७०व्या वर्षी निधन झालं आहे. 

किंग ऑफ पॉप म्हणून ओळखला जाणारा हॉलिवूड गायक मायकल जॅक्सन (Michael Jackson) त्याच्या जादुई आवाजासाठी जगभर प्रसिद्ध होता. आवाजाबरोबरच त्याच्या डान्सिंग स्टाइलवरही चाहते फिदा होते. मायकल जॅक्सनची क्रेझ आजही कायम आहे. मायकल जॅक्सनच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मायकलचा भाऊ टिटो जॅक्सन यांचं ७०व्या वर्षी निधन झालं आहे. 

टिटो यांच्या मुलांनी त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत टिटो यांच्या निधनाची बातमी मुलांनी दिली आहे. "हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की आमचे वडील, रॉक अँड रोल हॉल ऑफ फेम टिटो जॅक्सन यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने आम्हाला धक्का बसला आहे. आमचे वडील एक उत्कृष्ट व्यक्ती होते जे प्रत्येकाची काळजी घ्यायचे", असं पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे. टिटो यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, त्यांच्या जवळच्या मित्राने रोड ट्रिप दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

टिटो जॅक्सन यांचे पूर्ण नाव टोरियानो एडरिल आहे. १५ ऑक्टोबर १९५३ रोजी त्यांचा जन्म झाला होता. भावप्रमाणेच ते देखील एक उत्तम गायक आणि डान्सरही होते. आपल्या गाण्यांनी त्यांनी ७० चं दशक गाजवलं होतं. आय वॉन्ट यू बॅक, आय विल बी देअर, द लव्ह यू सेव्ह आणि एबीसी ही त्यांची गाणी लोकप्रिय ठरली होती. 

टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यू