सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कारांकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आज या पुरस्कारांची घोषणा झाली. 92 व्या ऑस्करपुरस्कार सोहळ्यात सर्वात पहिला अवार्ड हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिटने आपल्या नावावर केला. ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ या चित्रपटासाठी त्याने बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर श्रेणीत ऑस्कर जिंकला. एल पचिनो, जोई पेस्की, अँथनी हॉपकिंग्स आणि टॉम हॅक्स यांना मागे सारत ब्रॅडने या पुरस्कारावर नाव कोरले.ब्रॅड पिट गत 33 वर्षांपासून हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आपल्या तीन दशकांच्या करिअरमध्ये त्याने अनेक यादगार सिनेमे दिलेत. मात्र आत्तापर्यंत प्रत्येकवेळी त्याला ऑस्करने हुलकावणी दिली होती. 92 व्या ऑस्कर सोहळ्यात मात्र ब्रॅडचे ऑस्कर जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
ब्रॅड पिट त्याच्या लूक्ससोबतच त्याच्या आयकॉनिक्स रोल्ससाठी ओळखला जातो. 1999 मध्ये आलेल्या त्याच्या ‘फाईट क्लब’ या सिनेमात त्याने साकारलेले टेलर डर्डनचे पात्र अफलातून होते. सेवेन, इनग्नोरियस, दि ट्री ऑफ लाईफ, बेबल, स्रॅच अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे.1996 मध्ये ब्रॅड पिट ऑस्करमध्ये पहिल्यांदा नॉमिनेट झाला होता. त्यावेळी ‘12 मंकी’ या चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर श्रेणीत त्याला नामांकन मिळाले होते. पण त्यावेळी ब्रॅड पिट हा पुरस्कार जिंकू शकला नव्हता. यानंतरच्या 13 वर्षांत ब्रॅड पिटला एकदाही ऑस्करसाठी नामांकन मिळाले नाही. मात्र 2009 साली बेस्ट अॅक्टर इन लीडिंग रोलसाठी तो पुन्हा एकदा नॉमिनेट झाला. पण नामांकन मिळूनही ऑस्करने त्याला हुलकावणी दिली होती. 2012 मध्येही त्याला नामांकन मिळाले. मात्र त्यावर्षीही ऑस्कर जिंकण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले होते.