Oscar 2022 Slap Incident Will Smith : जगभरातल्या कोट्यवधी प्रेक्षकांसाठी ऑस्करचा पुरस्कार सोहळा म्हणजे पर्वणी असतो. सोहळ्याचा सूत्रसंचालक कधी शाब्दिक कोट्या करत तर कधी विनोदी कोपरखळ्या मारत सोहळ्याचे वातावरण हलकेफुलके ठेवतो. मात्र, सोमवारी झालेला पुरस्कार सोहळा या सगळ्याला अपवाद ठरला. प्रख्यात अभिनेता विल स्मिथ (Will Smith) याने थेट रंगमंचावर जाऊन सूत्रसंचालकाची भूमिका वठवत असलेला विनोदवीर ख्रिस रॉक (Chris Rock) याच्या श्रीमुखात लगावली अन् जगभरातील कोट्यवधी प्रेक्षक अवाक् झाले. पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने संतापाच्या भरात विलने ही कृती केली. परंतु यानंतर त्यानं बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार स्वीकारताना आपल्या कृत्याबद्दल माफीही मागितली. आता त्यानं यासंदर्भात सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्टही शेअर केली आहे.
"कोणत्याही प्रकारची हिंसा ही विनाशकारीच असते. पुरस्कार सोहळ्यादरम्यानचं माझी वर्तणूक अयोग्य होती आणि त्यासाठी कोणताही बहाणा चालणार नाही. माझ्या दृष्टीनं विनोद हा आमच्या कामाचाच भाग आहे. परंतु जेडाच्या (Will Smith Wife Jada Pinkett Smith) मेडिकल कंडिशनवर जोक करणं माझ्यानं सहन झालं नाही आणि मी त्यावर रिअॅक्ट झालो," असं विल स्मिथनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे.
"स्मिथ सार्वजनिकरित्या मी तुझी माफी मागू इच्छितो. मी आपली मर्यादा ओलांडली आणि मी चुकीचा होती. मी याबद्दल खेद व्यक्त करतो. मी अॅकेडमीचीही माफी मागू इच्छितो, शोच्या प्रोड्युसर्सची, त्या ठिकाणी आलेल्या सर्व लोकांची आणि जगभरातील त्या लोकांची जे तो शो पाहत होते, त्यांचीही माफी मागू इच्छितो. विल्यम्स आणि रिचर्ड फॅमिलीचीही मला माफी मागायची आहे. एका चांगल्या प्रवासात मी असं कृत्य केलं," असंही त्यानं स्पष्ट केलं. शिवाय मी स्वत:वर काम करत आहे, असंही तो म्हमाला. दरम्यान, ख्रिस रॉकनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘जीआय जेन२’ हा चित्रपट आला तर त्याची नायिका जेदा हीच असेल, असे ख्रिस म्हणाला. पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संतापलेल्या विलने थेट रंगमंचावर धाव घेत ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. हा प्रकार एवढा झटपट घडला की उपस्थित प्रेक्षकही स्मिथच्या या कृतीने अवाक् झाले. जागेवर परतल्यानंतरही स्मिथने अर्वाच्य भाषेत ख्रिस रॉकला समज दिली.