क्वांटिको गर्ल प्रियंका चोपडा यांच्यासाठी आली धावून; पहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2017 3:59 PM
बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा ही अतिशय संवेदनशील स्वभावाची असल्याचे वेळोवेळी बघावयास मिळाले आहे. आता ती श्वानांच्या मदतीसाठी धावून आली आहे.
बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा ही अतिशय संवेदनशील स्वभावाची असल्याचे वेळोवेळी बघावयास मिळाले आहे. आता ती श्वानांच्या मदतीसाठी धावून आली असून, त्यांचा होणारा अतोनात छळ थांबविला जावा, याबाबतचे लोकांना आवाहन करणारा एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे. हॉलिवूड अभिनेता टॉम हार्डी आणि केसी एफ्लेक यांच्याबरोबर ‘पेटा’च्या एका व्हिडीओला प्रियंकाने आवाज दिला आहे. या व्हिडीओमध्ये लोकांनी त्यांच्या पाळीव श्वानांना कौटुबिक सदस्यांप्रमाणे वागणूक द्यावी आणि थंडीमध्ये त्यांना घराबाहेर साखळीने बांधून न ठेवता त्यांना घरातच जागा द्यावी. त्याचबरोबर त्यांच्या खाण्या-पिण्याचीही वेळोवेळी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. व्हिडीओमध्ये अमेरिकी टीव्ही होस्ट बिल मेहर, अभिनेता एडी फाल्को, रॅपर डी. आर. ए. एम., लॅटिन अभिनेत्री केट डेल कॅस्टिलो यांचाही आवाज ऐकावयास मिळतो. पेटाने या व्हिडीओमध्ये वास्तविक जीवनात उपेक्षित असलेल्या श्वानांना दाखविले आहे. ज्यांना पेटाच्या अमेरिकी कार्यकर्त्यांनी पकडले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच बर्फाच्या वर्षावात लोखंडी साखळीने बांधलेले श्वान बघावयास मिळत आहेत. ज्यांना हार्डी विचारतो, जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा घेऊन आले होते तेव्हा तुम्ही मला लोखंडी साखळीने बांधून ठेवाल, असा विचार केला होता काय? मध्येच एक वयस्कर श्वान दाखविण्यात आला, ज्याला प्रियंकाने आवाज दिला आहे. वयोवृद्ध झाल्यानंतर जो त्रास होतो तो तुम्ही कधी अनुभवला काय? माझ्यासाठी ही बाब फारशी महत्त्वपूर्ण नाही. मात्र यामुळे मला जो त्रास होत आहे तो असह्य आहे. हा व्हिडीओ यू-ट्यूबवर शेअर करण्यात आला आहे.