कोरोना व्हायरसचे जगभरावरील संकट दूर व्हायचं काही नाव घेत नाही. देशातही कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे कित्येकांचा जीव गेला आहे. या संकटावर मात करण्यासाठी बॉलिवूडचे सेलिब्रेटींनी मदतीचा हात दिला आहे. यासोबतच हॉलिवूड अभिनेता मार्क वॉलबर्गने आपल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटात वाऱ्यावर सोडले नाही. त्यांना पुढील सहा महिन्यांचा पगार देऊन सुट्टीवर पाठवले आहे.
मार्क वॉलबर्ग हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयासोबतच तो हॉटेल व्यवसायातही कार्यरत आहे. इंग्लंडमध्ये त्याच्या मालकीची पाच हॉटेल्स आहेत. मात्र कोरोनामुळे गेले दोन महिने हॉटेल बंद आहे. त्यामुळे मार्कचे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र या आर्थिक संकटातही त्याने आपल्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची काळजी घेतली आहे.
द सनने दिलेल्या रिपोर्टनुसार मार्कने पुढील सहा महिन्यांचा पगार देऊन कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी त्याने हॉटेल व्यवसायातून बचत केलेले सर्व पैसे वापरले आहेत. याशिवाय मार्कने काही कर्ज देखील घेतले आहे. त्याने केलेल्या मदतीमुळे कर्मचारी खूश आहेत. मार्कने केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे.