Join us

मिनी माऊसला आवाज देणाऱ्या आर्टिस्टचं निधन, तीस वर्षे दिला होता डिज्नीच्या या पात्राला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 5:52 PM

डिज्नीमधील प्रसिद्ध कॅरेक्टर्समधील मिनी माऊसला आवाज देणाऱ्या रूसी टेलर यांचं निधन झालं आहे.

डिज्नीमधील प्रसिद्ध कॅरेक्टर्समधील मिनी माऊस आठवतंय ना... या पात्राला आवाज देणारी एक महिला आहे. त्यांचं नाव आहे रूसी टेलर. आता चाहत्यांना त्यांचा आवाज ऐकायला मिळणार नाही. कारण ७५ वर्षीय रुसी टेलर यांचं निधन झालं आहे. वाल्ट डिज्नी कंपनीचे सीईओ बॉब इगर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ही माहिती दिली आहे.

रूसी टेलर यांचं निधन २६ जुलै रोजी कॅलिफोर्नियामधील ग्लेनडेनमध्ये झाला. बॉब यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की, रूसी टेलर यांच्या निधनानंतर मिनी माऊसनं आपला आवाज गमावलाय. मिनी आणि रूसी यांनी तीसहून अधिक काळ जगभरातील लोकांचं मनोरंजन केलंय. एक अशी पार्टनरशिप ज्यानं मिनीला ग्लोबल आयकॉन बनवलं आणि रूसी यांना डिज्नीचं लिजेंड, ज्यासाठी त्यांना फॅन्सचं खूप प्रेमही मिळालं. रूसी यांना नेहमीच आठवलं जाईल. त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रांनासोबत तीव्र संवेदना व्यक्त करतो.

गुफीच्या पात्राला आवाज देणारे बिल फार्मर यांनीदेखील सोशल मीडियावर रूसी यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं की रूसी कुटुंबासारखी खूप जवळची होती. अद्भूत, मजेशीर व मिनी माऊससारखी गोड होती. रूसी, मिकी माऊसला आवाज देणारे वेन ऑलवाइन यांची पत्नी होत्या. वेन ऑलवाइन यांचंदेखली निधन झालं आहे.

रूसी टेलर यांनी टीवी, थीम पार्क, एनिमेटेड शॉर्ड आणि थिएट्रिकल चित्रपटांत मिनी माऊसला आवाज दिला आहे. रुसी टेलर स्वतः देखील डिज्नीच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या. मिनी व्यतिरिक्त रूसी यांनी ओरिजनल डक टेल्समध्ये डोनाल्ड डकचे नातेवाईक असलेल्या अनेक कॅरेक्टर्सना आवाज दिलाय.