'पद्मावत', 'राजी', 'पिहू', 'कड़वी हवा' आणि 'न्यूड' या सिनेमांची ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत एन्ट्री करण्यात आली होती. मात्र आसामी चित्रपट 'व्हिलेज रॉकस्टार' चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाने यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात बेस्ट फिचर फिल्मचा पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली आहे.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने आज जाहीर केले आहे की 'व्हिलेज रॉकस्टार' चित्रपट ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट विभागात भाराताचे प्रतिनिधीत्व करेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा दास यांनी केले आहे. हा चित्रपट सत्तरहून अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवलेला आहे. या चित्रपटाने चार राष्ट्रीय पुरस्कारांसह 44 पुरस्कार पटकावले आहेत. या चित्रपटातील बालकलाकार भनिता दास हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच मल्लिका दास यांना बेस्ट लोकेशन साउंड रिकॉर्डिस्टचा पुरस्कार मिळाला आहे.
'व्हिलेज रॉकस्टार्स' चित्रपटात एका मुलीची कथा दाखवण्यात आली आहे जिला गिटारिस्ट बनायचे असते. दहा वर्षाच्या या मुलीला संगीत क्षेत्रातून जगभरात आपले नाव बनवायचे असते. हा चित्रपट 28 सप्टेंबरला भारतात प्रदर्शित होणार आहे. तब्बल 29 वर्षांनंतर एखाद्या आसामी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. आता हा चित्रपट ऑस्करवारीसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटासाठी रीमा दास यांनी आपली सर्व जमापुंजी खर्च केली आहे.ऑस्कर पुरस्कारासाठी प्रतिनिधीत्व करण्यासाठी व्हिलेज रॉकस्टार चित्रपटाची निवड केल्यानंतर दिग्दर्शिका रीमा दास यांनी सोशल मीडियावर लिहिले की, त्यांच्यासाठी हा खूप मोठा सन्मान आहे आणि निवड झाल्यामुळे त्या खूप खूश आहेत.