25 Years Of Titanic: 1997 साली आजच्या दिवशी म्हणजे 19 डिसेंबरला चित्रपटगृहांत एक सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. अख्खं जग या हॉलिवूडपटाच्या प्रेमात पडलं. आजही हा सिनेमा आठवला की, त्यातली एक ना अनेक दृश्य डोळ्यांपुढे येतात. आम्ही बोलतोय ते ‘टायटॅनिक’ (Titanic Movie) या क्लासिक सिनेमाबद्दल. या सिनेमाच्या रिलीजला आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.
दिग्गज दिग्दर्शक जेम्स कॅमेरून (James Cameron) यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. ‘टायटॅनिक’ त्या काळातला सर्वात महागडा सिनेमा होता. आजही जगभरातील टॉपमोस्ट चित्रपटांच्या यादीत या सिनेमाचा समावेश होतो. पाण्यातला विध्वंस दाखवणाऱ्या या सिनेमावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला होता. 15 एप्रिल 1912 साली ‘टायटॅनिक’ जहाज नॉर्थ अॅटलांटिक ओशनमध्ये एका हिमनगाला धडकून बुडालं होतं. याचीच कथा या सिनेमात दाखवली आहे. जेम्सने टायटॅनिक दुर्घनेवर सिनेमा बनवायचा निर्णय घेतला. पण जेम्सला यात फक्त दु:खान्तिका दाखवायची नव्हती. म्हणून त्याने यात एक लव्ह स्टोरी जोडली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ‘टायटॅनिक’ जहाज बनवायला जितका खर्च झाला त्यापेक्षा 25 टक्के अधिक खर्च ‘टायटॅनिक’ या सिनेमावर झाला होता. अगदी एका एका सीनवर कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले होते.
इतका होता एकूण खर्च...‘टायटॅनिक’ सिनेमात प्रत्येक बारीक गोष्टींवर लक्ष दिलं गेलं होतं. चित्रपटात जहाजावरचं जे कार्पेट होतं, ते ओरिजन टायटॅनिकसाठी कार्पेट बनवणाऱ्या कारागिराने बनवलं होतं. चित्रपटातील एका सीनमध्ये जहाज बुडताना दाखवलं गेलं. यासाठी 1 कोटी लीटर पाण्याचा वापर झाला होता. साहजिकच या बारकाव्यांवर प्रचंड पैसा खर्च झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमावर एकूण 1250 कोटी रूपयांचा खर्च झाला. ऐकून आश्चर्य वाटेल पण, खऱ्या ‘टायटॅनिक’ जहाजाची किंमत किती होती तर फक्त 47 कोटी रूपये. याचा अर्थ ‘टायटॅनिक’ चित्रपटातील प्रत्येक सीनवर सरासरी 6.57 कोटी रूपये खर्च केला गेला.
जेम्स अक्षरश: भारावला होता...जेम्स कॅमेरून ‘टायटॅनिक’ बनवताना अक्षरश: भारावला होता. अगदी एक अंडरवॉटर सीन शूट करण्यासाठी त्याने खोल समुद्रात उडी घेतली होती. जेम्सने 1995 मध्ये या सिनेमावर काम करणं सुरू केलं होतं. खºया ‘टायटॅनिक’चे फुटेज मिळवण्यासाठी तो 12 हजार फूट खोल पाण्यात गेला होता. अगदी हुबेहुब ‘टायटॅनिक’ जहाज तयार करण्यासाठी त्याने खऱ्या जहाजाच्या ब्लूप्रिंट पाहून रिप्लिका तयार केली होती. तसेच कार्पेटपासून ते फर्निचर त्याच कंपन्याकडून तयार केले होते, ज्यांनी ओरिजनल ‘टायटॅनिक’ जहाजाच्या वस्तू तयार केल्या होत्या.
- तर मी जिवंत राहणार नाही...हा चित्रपट दोन तासांचा असावा तरच जादा कमाई होईल असं निर्मात्यांचं मत होतं. पण जेम्स मानायला तयार नव्हता. 3 तासांच्या सिनेमा केला नाही तर मी जीवंत राहणार नाही, अशी धमकीच जेम्सने दिली होती.