कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. ऑफिसेसमध्ये देखील अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. लोकांनी घरातून कमीत कमी बाहेर पडावे. गरज असेल तरच सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय वापरावा असे सरकार गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगत आहे.
कोरोनामुळे जगभरातील अनेकांना आजवर आपले प्राण गमवावे लागले आहेत. एका अभिनेत्रीच्या वडिलांचे देखील या गंभीर आजारामुळे नुकतेच निधन झाले आहे. ट्रान्सफॉर्मर या चित्रपटामुळे नावारूपाला आलेली सोफिया माईल्सच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले असून तिनेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितली आहे.
सोफियाचे वडील पीटर माईल्स यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निदान १४ मार्चला झाले होते. तेव्हापासून त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले होते. सोफिया रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत असे आणि त्यांच्या तब्येतीविषयी सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगत असे. शनिवारी सोफियाने ट्वीट करत कोरोनामुळे तिच्या वडिलांचे निधन झाले असल्याचे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.
सोफियाने त्यानंतर काही तासांनी रुग्णालयात असतानाचा तिच्या वडिलांसोबतचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ती वडिलांसोबत रुग्णालयात दिसत असून तिने मास्क, ग्लोव्हज घातले असल्याचे आपल्याला या फोटोत पाहायला मिळत आहे.
सोफियाच्या वडिलांना २०१८ मध्ये मज्जासंस्थेसंदर्भातील आजार झाला होता. आता त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सोफियाच्या कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.