ट्रम्प तर डायनासोर - हेलेन मिरेन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 4:10 PM
आॅस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री हेलेन मिरेन हिने रिपब्लिकन पक्षाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना डायनासोर म्हणून संबोधले ...
आॅस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री हेलेन मिरेन हिने रिपब्लिकन पक्षाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना डायनासोर म्हणून संबोधले आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मिरेनने ट्रम्प यांच्यावर टीका करताना त्यांना डायनासोरची उपमा दिली. मिरेन म्हणाली, डायनासोरची जमात पूर्णत: नष्ट झाली, मात्र अजूनही काही डायनासोर जिवंत आहेत. त्यातीलच डोनाल्ड ट्रम्प हे एक. मिरेनने ट्रम्प यांच्या शरीरयष्टीचीही खिल्ली उडवली. ट्रम्प यांचे शरीर विशालकाय डायनासोर सारखेच आहे. त्याच्या हाताचे निरीक्षण केल्यास तुम्हाला हा फरक स्पष्टपणे जाणवेल. डायनासोरप्रमाणेच त्यांची बुद्धी देखील लहानच आहे. मिरेनने यापूर्वीच हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा घोषित केला. ती हिलरींच्या विविध अभियानात सक्रिय सहभागी आहे. तिच्या मते हिलरी याच अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या योग्य उमेदवार असून, ट्रम्प हे देशाला विनाशाकडे घेवून जातील. सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही उमेदवार एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यात मिरेनने भर टाकली असून, येत्या काळात हे शाब्दिक युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. मिरेन सध्या हॉलिवूड सेलिब्रिटींनी हिलरींना पाठिंबा द्यावा यासाठीही प्रयत्न करीत असल्याचे समजते. हिलरी यांच्या समर्थनार्थ सध्या मिरेन विविध ठिकाणी प्रचारात सहभागी होत असून, ट्रम्प यांच्यावर सडकून टीका करीत आहे. डायनासोरची उपमा दिल्याने ट्रम्प यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.