X-Men फेम अभिनेता अदन कैंटो यांचा कॅन्सरने निधन झालं आहे. तो ४२ वर्षांचा होता. गेल्या काही दिवसांपासून तो कॅन्सरशी लढा देत होता. कैंटो अपेंडिक्स(appendiceal) कॅन्सरने ग्रस्त होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते. पण, अखेर ८ जानेवारीला त्याची झुंज संपली. अदन कैंटोच्या निधनाने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. तर त्याच्या कुटुंबीयांना खूप मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अदन कैंटोने अनेक सुपरहिट हॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं होतं. पण, 'द क्लिनिंग लेडी' या टीव्ही सीरिजमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती. 'द क्लिनिंग लेडी' या सीरिजच्या दोन सीझनमध्ये त्याने काम केलं होतं. पण, कॅन्सरमुळे या सीरिजच्या तिसऱ्या सीझनसाठी त्याला काम करणं शक्य झालं नाही. सध्या द क्लिनिंग लेडी सीरिजच्या तिसऱ्या सीझनचं शूटिंग सुरू आहे.
अभिनेत्याबरोबरच कैंटो गायक, गिटारिस्ट आणि दिग्दर्शकही होता. त्याने गीतकार म्हणून सिनेइंडस्ट्रीमधील करिअरला सुरुवात केली होती. अनेक मॅक्सिकन टीव्ही शो आणि चित्रपटांसाठी त्याने गाणी लिहिली होती. २००९ साली त्याला टीव्ही मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर अनेक टीव्ही मालिकांमध्ये अदन कैंटो दिसला. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या X-Men या हॉलिवूड चित्रपटामुळे अदन कैंटो प्रसिद्धीझोतात आला होता. या सिनेमात त्याने सुपरहिरोची भूमिका साकारली होती. अदन कैंटोच्या मागे त्याची पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. त्याचा दुसरा मुलगा केवळ एक वर्षाचा आहे. अदन कैंटोच्या निधनाने त्याच्या मुलांच्या डोक्यावरुन पित्याचं छत्र हरपलं आहे.