Join us

अनेकदा ट्रोल झालेत पण व्यक्त व्हायचे थांबले नाहीत ऋषी कपूर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 12:54 PM

ऋषी कपूर अख्खे आयुष्य परिणामांची चिंता न करता स्वत:च्या अटींवर जगले. 

ठळक मुद्देमृत्यूच्या अगदी काही दिवस आधी त्यांनी केलेले ट्विटही वादग्रस्त ठरले होते.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले. ऋषी कपूर अख्खे आयुष्य परिणामांची चिंता न करता स्वत:च्या अटींवर जगले. जगाची पर्वा न करता व्यक्त झालेत. अगदी मृत्यूपूर्वीपर्यंत ते सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिह होते. ट्विटरवर तर ते प्रत्येक मुद्यावर व्यक्त होत. यामुळे अनेकदा त्यांनी वादही ओढवून घेतले. लोकांनी त्यांना अनेकदा ट्रोलही केले. पण ऋषी कपूर यांनी कुणाचीही पर्वा न करता, अगदी परखडपणे आपले विचार व्यक्त केलेत. अगदी ट्रोलर्सला ते   पुरून उरलेत.  

ऋषी कपूर केवळ देशातील मुद्यांवरच आपले विचार मांडले नाहीत तर त्यांच्या इंडस्ट्रीवरून त्यांनी अनेकदा हल्लाबोल केला होता. फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक लोक आहेत ज्यांना अ‍ॅक्टिंगमधला अ की ढ येत नाही. असे अनेक अ‍ॅक्टर्स मी पाहतो. अ‍ॅक्टिंगसाठी भीक मागणे आणि शिफारसींच्या जोरावर चित्रपटांत काम मिळवणे हे सगळे चुकीचे आहे. एका चांगल्या अ‍ॅक्टरला चांगली अ‍ॅक्टिंग यायलाच हवी, असे ते एका मुलाखतीत म्हणाले होते.

2017 त्यांनी क्रिकेटवर एक ट्विट केले होते. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान त्यांनी हे ट्विट केले होते. सोबत सौरभ गांगुलीचा एक फोटोही शेअर केला होता. त्यांच्या या ट्विटवरून वादळ उठले होते. पण ऋषी कपूर यांनी यावरून माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला होता.  ऋषी कपूर यांना बीफ खाण्यावरूनही विरोध टीका सहन करावी लागली आहे.  एका कार्यक्रमात बोलताना होय, मी बीफ खाल्लेयं, अशी जाहीर कबुली त्यांनी दिली होती, यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झंडे दाखवत, या विधानासाठी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.

काश्मिर मुद्यावर बोलताना त्यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या एका वक्तव्यावर ट्विट केले होते. ‘फारख अब्दुल्लाजी सलाम, मी तुमच्या मताशी सहमत आहे. जम्मू-काश्मीर आपला आहे आणि पीओके त्यांचा. भारत-पाक कितीही युद्ध करतो,केवळ याच मागार्ने काश्मीर समस्या सुटू शकते, ’ असे ट्विट त्यांनी केले होते़ त्यांच्या या ट्विटविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती.

मृत्यूच्या अगदी काही दिवस आधी त्यांनी केलेले ट्विटही वादग्रस्त ठरले होते. कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दारूची दुकाने उघडण्यास सरकारने परवानगी द्यावी अशा आशयाचे ट्विट केले होते. ‘लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने संध्याकाळच्या वेळेत दारूची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. मला चुकीचे समजू नका. पण सध्या घरी बसून लोकांचा ताण वाढला आहे. डॉक्टर आणि पोलिसांनाही तणावातून मुक्ती हवरी आहे. ब्लॅकमध्ये तर विकल्या जात आहेच,’ असे ट्विट त्यांनी केले होते. या ट्विटवरून ते प्रचंड ट्रोल झाले होते.

टॅग्स :ऋषी कपूर