Join us

घर आणि कुटुंब यांच्यातील नाते सांगणारा ‘होम स्वीट होम’, या कलाकारांच्या असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 07:15 IST

चित्रपटाची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी,मुग्धा गोडबोले यांची आहे. तर  संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे.

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत,  कुटुंबसंस्था उदयास आल्यापासून घर ही संकल्पना रूढ झाली. घर हे फक्त चार भिंतीमुळे उभे राहत नाही, त्यासाठी लागतो कुटुंबाचा जिव्हाळा. प्रदेश,संस्कृती बदलली की घराची रचना बदलते भावना मात्र कायम असतात. घर हे काहीही न बोलता देखील घरातील सदस्यांबद्दल नकळतपणे खूप काही सांगून जाते.  कुटुंब आणि घर यांच्यातील अनोखे नाते नव्या दृष्टीकोनातून सांगणारा ‘होम स्वीट होम’ हा मराठी चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. यांची असून प्रोअॅक्टिव्ह प्रस्तुतकर्ते आहेत. हृषीकेश जोशी दिग्दर्शित  ‘होम स्वीट होम’ या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री रीमा तसेच मोहन जोशी, हृषीकेश जोशी, स्पृहा जोशी, प्रसाद ओक, विभावरी देशपांडे, सुमीत राघवन, मृणाल कुलकर्णी, क्षिती जोग, दीप्ती लेले, अभिषेक देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी,मुग्धा गोडबोले यांची आहे. तर  संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वैभव जोशी यांची कविता सांगून जातात. तसेच रीमा आणि मोहन जोशी या दांपत्यामधील निखळ आणि विनोदी किस्से मनाला भावतात. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या घराच्या विक्रीतून मोठी रक्कम मिळेल हे कळताच रीमा यांची उतारवयात सर्व सुखसुविधायुक्त अशा उच्चभ्रू इमारतीतील घर घेण्याची इच्छा होते; पण घराविषयी जिव्हाळा बाळगणारे मोहन जोशी घर विकण्यास कदाचित तयार नाहीत. स्पृहा जोशी साकारात असलेली अवखळ देवीका आणि हृषिकेश जोशी यांचा साधा, मध्यमवर्गीय सोपान सुद्धा मनाला भावणारा आहे.

सुमित राघवन आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा विविध माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याचा अमीट ठसा उमटवला आहे. मात्र आज पर्यंत त्यांनी कधीही एकत्रित काम केले नव्हते. पण फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

 

टॅग्स :सुमीत राघवनमोहन जोशीरिमा लागूस्पृहा जोशी