न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या दुर्मिळ कॅन्सरशी झुंज देत असलेला अभिनेता इरफान खानने ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाद्वारे कमबॅक केले. गत शुक्रवारी इमरानचा हा सिनेमा रिलीज झाला. खरे तर इमरानचे चाहते दीर्घकाळापासून या सिनेमाच्या रिलीजच्या प्रतीक्षेत होते. पण असे असूनही चित्रपटाला खराब ओपनिंग मिळाली. कोरोना व्हायरसमुळे भारतातील अनेक राज्यांतील चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. याचा जोरदार फटका ‘अंग्रेजी मीडियम’ला बसला.‘अंग्रेजी मीडियम’ला समीक्षकांनी मनापासून दाद दिली. पण बॉक्स ऑफिसवर मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. कोरोना व्हायरसच्या भीतीने केरळ, दिल्ली, महाराष्ट्र, बिहार अशा अनेक राज्यांतील मॉल, थिएटर्स बंद करण्यात आली आहेत. याचा जोरदार फटका ‘अंग्रेजी मीडियम’ला बसला. पहिल्या दिवशी ‘अंग्रेजी मीडियम’ने केवळ 4.03 कोटींची कमाई केली. पण दुस-या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत मोठी घट दिसली. दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाने केवळ 2.75 कोटींचा बिझनेस केला.
पुन्हा रिलीज होणार चित्रपट
कोरोना व्हायरसचा वाढता धोका बघता, अनेक चित्रपटांनी रिलीज डेट लांबणीवर टाकली. अनेक चित्रपटांचे शूटींगही पुढे ढकलण्यात आले. पण दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी अशास्थितीत ‘अंग्रेजी मीडियम’ रिलीज करण्याची जोखीम पत्करली. गत 13 मार्चला हा सिनेमा रिलीज झाला. पण याचदरम्यान अनेक राज्यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मॉल, थिएटर्स 31 मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा केला. यामुळे ‘अंग्रेजी मीडियम’चा बिझनेस एकदम खाली आला. अशात दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा पुन्हा रिलीज करण्याची घोषणा केली आहे. ‘पुढच्या निर्देशापर्यंत भारतात थिएटर्स बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे स्थिती सामान्य होताच आम्ही पुन्हा ‘अंग्रेजी मीडियम’ रिलीज करू. तोपर्यंत सुरक्षित राहा,’ असे होमी अजदानिया यांनी सोशल मीडियावरून जाहिर केले.