Join us

महादेव ॲपमुळे सेलिब्रिटी अडचणीत कसे आले?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 9:39 AM

सिनेउद्योगातील जाणकारांच्या मते या गोष्टींकडे दोन-तीन बाजूंनी पाहायला हवे. मुळात बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये जी वर्गवारी आहे तिथून आपल्याला विचार करावा लागेल.

- मनोज गडनीस विशेष प्रतिनिधीच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशांची उलाढाल आणि बॉलीवूडमधील अनेक कलाकारांचा समावेश यामुळे गेल्या वर्षी महादेव ॲप चांगलेच चर्चेत आले. मधल्या काळात हे प्रकरण थोडेसे थंडावलेदेखील; पण, गेल्या आठवड्यात अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आता पुन्हा एकदा या ॲपभोवतालची चर्चा सुरू झाली आहे. मुळात अशा काही अवैध व्यवसायाशी सेलिब्रिटी कसे जोडले जातात? त्यांना याची काही माहिती नसते का? की, माहिती असली तरीदेखील पैशांच्या मोहापोटी ते असे उद्योग करतात? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत.

सिनेउद्योगातील जाणकारांच्या मते या गोष्टींकडे दोन-तीन बाजूंनी पाहायला हवे. मुळात बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये जी वर्गवारी आहे तिथून आपल्याला विचार करावा लागेल. जे कलाकार नामांकित आहेत किंवा घराणेशाहीतून पुढे आले आहेत, असे कलाकारही अशा उद्योगांशी जोडल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी पाहायला मिळाली आहेत. मात्र, आपली प्रसिद्धी व वलय यामुळे आपले कोण काय बिघडवेल, अशी मस्ती त्यांच्यामध्ये असते. अशा कित्येक प्रकरणांत प्रसिद्ध कलाकारांना शिक्षाच झालेली नाही. ती प्रकरणे हळुवार विरून जातात. दुसरा मुद्दा म्हणजे, जे कलाकार बॉलीवूडमध्ये संघर्ष करत असतात त्यांना त्या उद्योगात टिकून राहण्यासाठी स्वतःची अशी एक जीवनशैली टिकवून ठेवायची असते. अशा लोकांना हेरून अनेक एजंट त्यांच्याकडे विविध ऑफर्स घेऊन येतात. अल्पावधीत मिळणारा पैसा आणि गरज या दोन्ही घटकांमुळे मग हे लोक अशा प्रलोभनांना सहजच भुलतात. या दोन्हींपलीकडे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 

काही अवैध उद्योगासाठी कलाकार प्रमोशनचे काम करतात त्यावेळी मुळात तो उद्योग अवैध आहे की नाही, याची माहिती त्यांना कितपत असते किंवा त्याची माहिती काढण्याची यंत्रणा अस्तित्वात आहे का? कोणती कंपनी आपल्या व्यवहारांचे तपशील प्रमोशन करणाऱ्या व्यक्तीला सांगते, हाही मुद्दा आहेच. पण, दुर्दैवाने मला माहिती नव्हते हा युक्तिवाद न्यायालयात टिकत नाही. त्यामुळे किमान आपल्याला मिळणारा पैसा हा धनादेशाने मिळत आहे की रोखीने, इतका किमान तर्क लावून व्यवहार केला तर कलाकारांच्या अडचणी कमी होऊ शकतात, असे एका निर्मात्याने सांगितले.

घोटाळा कसा उजेडात आला? nमहादेव ॲप कंपनीचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचा विवाह फेब्रुवारी २०२३ मध्ये दुबईत झाला.nया लग्नाकरिता भारतातून अनेक नामवंत बॉलीवूड कलाकार, काही बड्या व्यक्ती उपस्थित राहिल्या.nया लोकांना दुबईत नेण्यासाठी भारतातून १५० पेक्षा जास्त चार्टर्ड विमाने घेण्यात आली होती.nएकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर चार्टर्ड विमाने दुबईत जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपास यंत्रणा अलर्ट झाल्या व त्यांनी तपास सुरू केला.

२०० कोटींचे लग्न, तेही रोखीने...सौरभ चंद्राकर याने लग्नासाठी तब्बल २०० कोटी रुपये रोखीने खर्च केल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले आहे. त्याच्या लग्नासाठी बॉलीवूड कलाकारांचा प्रवास, निवासाची व्यवस्था आणि त्यांच्या सादरीकरणासाठी देण्यात आलेले मानधन असा सर्व व्यवहार रोखीने झाला. या विवाह सोहळ्याला उपस्थित कलाकारांना ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन गेल्याची चर्चा असून, या सर्वांना हवालाच्या माध्यमातून हे पैसे देण्यात आल्याच्या मुद्द्याचा ईडी तपास करीत आहे.

टॅग्स :धोकेबाजी