मीम्स कसे सुचतात? मिमस्टर सुमित पाटील सांगतो...
By शर्वरी जोशी | Published: September 4, 2021 03:27 PM2021-09-04T15:27:36+5:302021-09-04T15:28:38+5:30
Mimmaster sumit patil : अलिकडेच सुमित पाटीलने 'लोकमत ऑनलाइन'ला मुलाखत दिली असून त्याने मीम्सच्या अनोख्या दुनियेतील अनुभव शेअर केला आहे.
सध्याच्या काळात कोणतीही घटना घडली की लगेचच त्यावर मीम्स व्हायरल होतात. अगदी दैनंदिन जीवनातील सामान्य वाटणाऱ्या गोष्टींपासून ते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घटनांपर्यंत असंख्य मीम्स आजच्या घडीला व्हायरल झाल्याचं आपण पाहिलं आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर मीम्सचे काही खास पेजदेखील असल्याचं दिसून येतं. मात्र, हे मीम्स नेमकं कोण तयार करतं किंवा हे मीम्स कशा पद्धतीने तयार केले जातात. हे 'भाडिपा'फेम अभिनेता आणि मिमर सुमित पाटीलने सांगितलं आहे. अलिकडेच त्याने 'लोकमत ऑनलाइन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या मीम्सच्या अनोख्या दुनियेतील अनुभव शेअर केला आहे.
"खरं सांगायचं झालं तर मीम्स नेमके कसे सुचतात याचं नेमकं उत्तर देता येणार नाही. कारण काही वेळा विषय पटकन सुचतात. पण काही वेळा कितीही विचार केला तरीदेखील विषय पटकन सुचत नाही. बऱ्याचदा एखादं मीम तयार करायला महिनादेखील लागतो. त्यातच सध्याच्या घडीला मी अशा ठिकाणी येऊन पोहोचलोय की जेथे मला फार विचार करुन मीम करावं लागतं," असं सुमित म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "एखाद्या वेळी मला दिवसाकाठी जरी दहा मीम्स सुचले तरीदेखील त्या १० पैकी नेमक्या कोणत्या मीमवर काम करायचं याचा मला फार विचार करावा लागतो. कारण, सध्या माझं प्रत्येक मीम भाडिपासारख्या प्लॅटफॉर्मवर जात आहे. त्यामुळे या मीम्सवर मला जास्त काम करावं लागतं. म्हणूनच, मी स्वत:वर काही रिस्ट्रिक्शन घालून घेतले आहेत."
दरम्यान, सुमित पाटील हा एक लोकप्रिय मिमर असून सध्या तो भाडिपासारख्या मंचावर झळकत आहे. कोथरुड वर्सेस कोल्हापुर या नव्या सेगमेंटच्या माध्यमातून सुमित पाटील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.