Join us

'होम मिनिस्टर' सुरु होऊन किती वर्ष झाली?; तुम्हाला आठवतोय का कार्यक्रमाचा पहिला भाग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 14:29 IST

home minister: 'दार उघड बये दार उघड' हे टायटल साँग लागलं की महिला वर्गाची पावलं आपोआप टिव्हीच्या दिशेने जातात.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेला कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर. 'दार उघड बये दार उघड' हे टायटल साँग लागलं की महिला वर्गाची पावलं आपोआप टिव्हीच्या दिशेने जातात. त्यामुळे हा कार्यक्रम आज घराघरात लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन या कार्यक्रमाने गृहिणींची भेट घेतली त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, खेळ खेळले. त्यामुळे हा कार्यक्रम आज छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. परंतु, हा कार्यक्रम नेमका कधी सुरु झाला किंवा त्याला किती वर्ष झाली हे कोणाला आठतंय का?

होम  मिनिस्टरची २० वर्ष

होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरु होऊन तब्बल २०वर्ष झाली आहेत. विशेष म्हणजे इतक्या प्रदीर्घ काळ चालणारा हा पहिलाच कार्यक्रम ठरला आहे. त्यामुळे सध्या या कार्यक्रमाचं आणि आदेश बांदेकरांचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. १३ सप्टेंबर रोजी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता.  त्यानंतर या कार्यक्रमाने जो यश आणि लोकप्रियतेचा आलेख चढायला सुरुवात केली आहे तो अजूनपर्यंत कायम आहे.

आतापर्यंत या कार्यक्रमाचे एकूण ६ हजार भाग पूर्ण झाले असून आदेश बांदेकर आणि त्यांच्या टीमने १२ हजार घरांमधील गृहिणींची भेट घेतली आहे. या प्रवासात प्रत्येक गृहिणीला भेटण्यासाठी त्यांनी जवळपास १० लाख किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला आहे.

"हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. ६ भागांपुरता मर्यादित असलेला हा कार्यक्रम आता ६००० भाग पूर्ण करतोय. महाराष्ट्रातील स्त्रीचा, वहिनींचा सन्मान करता करता त्या घरात माझंही औक्षण झालं आणि कळत नकळत मीही त्या घराचा सदस्य झालो. प्रत्येक घरात गेल्यावर त्या माऊलीच्या चेहेऱ्यावर प्रसन्न भाव असतो. काही क्षण का होईना पण ती माऊली दिवसभराचं टेन्शन, थकवा विसरून जायची. तुमच्याशी बोलून खूप बरं वाटतं म्हणून कितीतरी जणांनी हॉस्पिटलमधून मला व्हिडिओ कॉल केलेत. मी खरंच खूप स्वतःला भाग्यवान समजतो", असं आदेश बांदेकर म्हणाले.

दरम्यान, आजपर्यंत या कार्यक्रमाचे २५ पेक्षा जास्त पर्व पार पडले आहेत. यात 'नांदा सौख्य भरे', 'पंढरीची वारी विशेष', 'नववधू नं १', 'जाऊबाई जोरात', 'स्वप्न गृह लक्ष्मीचे', 'होणार सून मी ह्या घरची', 'गोवा विशेष', 'काहे दिया परदेश', 'चूक भूल द्यावी घ्यावी', 'अगंबाई सुनबाई', 'महाराष्ट्र दौरा', 'भारत दौरा', कोरोना काळात झालेला 'होम मिनिस्टर घरच्याघरी', 'कोरोना योद्धा विशेष', 'सासुबाई माझ्या लईभारी' आणि नुकतंच पार पडलेलं 'महामिनिस्टर'.  

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीआदेश बांदेकर