सई ताम्हणकर (Saie Tamhankar) मराठी कलाविश्वात बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आतापर्यंत हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीत वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र आता ती एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या समोर आली आहे. सई पहिल्यांदाच लावणी सादर करताना दिसणार आहे. ती 'देवमाणूस' (Devmanus Movie) या सिनेमात 'आलेच मी...' या लावणीवर थिरकताना दिसणार आहे. दरम्यान सईने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील(Ashish Patil)सोबत आलेच मी या लावणीवर नाचताना दिसत आहे.
देवमाणूस सिनेमातील 'आलेच मी' ही लावणी नुकतीच प्रदर्शित करण्यात आली. या गाण्यावर सई ताम्हणकर थिरकताना दिसते आहे. सईला पहिल्यांदाच अशा अंदाजात पाहून चाहते खूश झाले आहेत आणि ते उत्स्फुर्त प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान आता या लावणीवर पुन्हा एकदा सई आशिष पाटीलसोबत थिरकली आहे आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने पांढऱ्या रंगाची नववारी साडी आणि त्यावर निळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे. कानात झुमके, नाकात नथ, हातात निळ्या बांगड्या, कपाळावर टिकली आणि केस मोकळे सोडून तिने लूक पूर्ण केला आहे. या व्हिडीओत तिच्या दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसोबत कलाकारही कमेंट्स करत आहेत.
सई ताम्हणकरने 'आलेच मी..' या लावणीसाठी तब्बल ३३ तासांपेक्षा अधिक वेळ सराव केला. लावणीच्या प्रत्येक नजाकतीत सई पूर्णपणे रमली आणि तिने दमदार परफॉर्मन्स सादर केला. याबद्दल सई म्हणाली, ''देवमाणूसमध्ये लावणी करणे हा एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. आशिष पाटीलच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती. प्रेक्षकांना माझे हे नवीन रूप नक्कीच आवडेल.''
'देवमाणूस'बद्दल..देवमाणूस हा चित्रपट २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देऊस्करने केले आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.