ब्रिटन देशाची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. राणी पदावर तब्बल ६९ वर्षे राहण्याचा विक्रम एलिझाबेथ यांच्या नावावर नोंदवला गेलाय. ब्रिटिश साम्राज्याचं राजपद सर्वाधिक काळ भोगलेली व्यक्ती आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. एलिझाबेथ यांनी २०१५ साली वयाच्या ८९ व्या वर्षी ब्रिटनची सर्वात प्रदीर्घ काळ राणी म्हणून हयात असलेली व्यक्ती हा विक्रम नोंदविला होता. त्यानंतर सात वर्षे त्या हयात होत्या. वयाच्या ९६व्या वर्षी बालमोराल येथील पॅलेसमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.
राणी एलिझाबेथ यांचे जीवन नेहमीच चर्चेत होते. त्यांच्या आयुष्यावर बऱ्याचदा ऐकायला मिळाले, लिहिले गेले. त्यांची लाइफस्टाइल असो किंवा त्यांचे नियम या सर्वांची चर्चा झाली होती. त्यामुळे अनेक चित्रपट, नाटक, मालिका आणि वेबसीरिजमधून राणी एलिझाबेथ यांचे आयुष्य प्रेक्षकांना पाहायला मिळाले.
द क्राउननेटफ्लिक्सच्या द क्राउनमध्ये राणी एलिझाबेथ यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या काळातील चित्रण करण्यासाठी तीन वेगवेगळ्या अभिनेत्रींची आवश्यकता होती. एलिझाबेथ यांचे तारुण्य अभिनेत्री क्लेअर फॉयने, मध्यम वय ऑलिव्हिया कोलमन आणि वृद्धावस्था इमेल्डा स्टॉन्टनने चित्रीत केले होते. शो राणी यांच्या साम्राज्यातील चढउतारांचा मागोवा घेतो. शोने एमी अवॉर्ड्स २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट नाटक मालिका, सर्वोत्कृष्ट अभिनेता (नाटक) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता असे प्रमुख पुरस्कार जिंकले.
द क्वीनया चित्रपटात हेलन मिरेनने राणी एलिझाबेथ यांची भूमिका साकारली होती. स्टीफन फ्रेअर्स दिग्दर्शित, या चित्रपटात राजकुमारी डायनाच्या मृत्यूशी संबंधित घटना दर्शविली गेली. चित्रपट पाहिल्यानंतर, प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूनंतर राजघराण्यामध्ये काय घडले हे तुम्हाला कळेल? या चित्रपटाची कथा पीटर मॉर्गन यांनी लिहिली आहे.
अ रॉयल नाइट आउटराजकुमारी एलिझाबेथ यांच्यावर आधारित या चित्रपटात राणीच्या भूमिकेत सारा गॅडॉन आणि तिची बहीण राजकुमारी मार्गारेट म्हणून बेल पॉली. चित्रपटाची कथा अगदी साधी होती. या दोन्ही बहिणी राजघराण्यातील कोणत्याही निर्बंधाशिवाय आनंद घेण्यासाठी बाहेर जाण्याचा प्रयत्न कसा करतात हे दाखवण्यात आले आहे.
द रॉयल हाऊस ऑफ विंडसरपहिल्या महायुद्धानंतर राजघराण्यातील बदल जाणून घेण्यासाठी तुम्ही 'द रॉयल हाउस ऑफ विंडसर' पाहू शकता. ही डॉक्युमेंट्री खऱ्या फुटेजच्या मदतीने बनवण्यात आली आहे. यात येल कुटुंबाशी संबंधित असलेल्या लोकांच्या मुलाखती आहेत.
या माहितीपटात महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या जीवनाशी निगडित किस्सेही सांगण्यात आले आहेत.