Join us

Hrishikesh Mukherjee Birthday : या कारणामुळे अमिताभ बच्चनही घाबरायचे हृषिकेश मुखर्जी यांना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 6:00 AM

Hrishikesh Mukherjee Birthday : हृषिकेश मुखर्जी यांच्या अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ यांनी काम केले आहे.

ठळक मुद्देहृषिकेश मुखर्जी हे अतिशय स्ट्रिक्ट असल्याने महानायक अमिताभ बच्चन देखील त्यांना घाबरायचे. अमिताभ यांनीच हा किस्सा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सांगितला होता.

हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आनंद, गुड्डी, चुपके चुपके, सत्यकाम, गोलमाल, देवदास, अनारी, नमक हराम, बावर्ची, अभिमान यांसारखे अनेक चित्रपट प्रेक्षकांना भावले. त्यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. ऋषिकेश मुखर्जी त्यांच्या कामाच्याबाबतीत अतिशय गंभीर असायचे. कामात कोणीही हलगर्जीपणा केल्याचे त्यांना पटायचे नाही आणि ते त्यामुळे चिडायचे. 

हृषिकेश मुखर्जी हे अतिशय स्ट्रिक्ट असल्याने महानायक अमिताभ बच्चन देखील त्यांना घाबरायचे. अमिताभ यांनीच हा किस्सा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सांगितला होता. 2010 मध्ये कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात धर्मेंद्र गेस्ट म्हणून आले होते. त्यावेळी अमिताभ आणि धर्मेंद्र यांनी हृषिकेश मुखर्जी यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. धर्मेंद्र यांनी अमिताभ यांना या कार्यक्रमात विचारले होते की, अमित कोणता दिग्दर्शक आहे की ज्यांना आपण घाबरत होतो, जे एखाद्या स्कूल प्रिन्सिपलप्रमाणे होते? त्यावर अमिताभ यांनी सांगितले होते की, ऋषी दा यांच्यासोबत काम करताना आम्ही अक्षरशः कापायचो. ऋषी दा यांच्या चुपके चुपके या चित्रपटात धर्मेंद्र आणि अमिताभ यांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

अमिताभ यांना खरी ओळख ऋषी दा यांच्या आनंद या चित्रपटानेच मिळवून दिली. या चित्रपटात खरे पहिल्यांदा किशोर कुमार मुख्य भूमिकेत होते. किशोर कुमार यांचा त्यावेळी एका बंगाली निर्मात्यासोबत वाद झाला होता. त्यामुळे मला कोणी बंगाली निर्माता भेटायला आला तर त्याला पळव... असे किशोर कुमार यांनी त्यांच्या गार्डला सांगितले होते. ते निर्माते ऋषी दा आहेत असे समजून गार्डने त्यांना किशोर कुमार यांना भेटून दिले नव्हते. त्यावेळी ऋषी दा किशोर कुमार यांना आनंद या चित्रपटाविषयीच सांगायला आले होते. किशोर कुमार यांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी त्या गार्डला नोकरीवरून काढून टाकले होते. पण यामुळे किशोर कुमार यांना आनंद या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही. 

 

टॅग्स :अमिताभ बच्चनधमेंद्रकौन बनेगा करोडपतीकिशोर कुमार