चित्राली चोगले-अणावकर
Stars - 2.5
Timepass 3 Movie Review : 'हम जियेंगे भी अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से..' असं म्हणत सुरु झालेली दगडू आणि प्राजूची लव्हस्टोरी तुम्हाला आठवत असेलच ती 'टाईमपास' मधली हो. आता तुम्ही म्हणाल त्यानंतर तर ते दोघं मोठे झाले आणि मग त्यांची 'टाईमपास 2' मधली लव्हस्टोरी सुद्धा पाहिली, मग आत्ता पुन्हा कुठे आले दगडू-प्राजू. तर यंदा निमित्त आहे 'टाईमपास 3' (Timepass 3) चं कारण पुन्हा एकदा दगडूच्या प्रेमाला नवीन 'पालवी' फुटणार आहे आणि ही ' फालवी फक्त फुटणार नाही तर फोडणार आहे. दगडूच्या हृदयाला तोडून प्राजू निघून गेल्यानंतर तब्बल चार वर्षांनी घडतो तो म्हणजे 'टाईमपास 3'. आता नेमकं इथे काय घडतं?, आणि या वेळेला तरी दगडूला त्याचं प्रेम मिळतं का? ते जाणून घेण्यासाठी हा सिनेमा तुम्हाला पाहावा लागणार आहे. पण, तो पाहायचा की नाही ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दगडूच्या आयुष्यातून प्राजु निघून गेल्यानंतर कॉलेजमध्ये त्याची झालेली एन्ट्री आणि तिथे त्याच्या आयुष्यात एन्ट्री होते ती पालवीची (हृता दुर्गुळे). पण ही लव्हस्टोरी दगडूच्या आधीच्या लवस्टोरी सारखी अजिबात नाही. सालस आणि अगदी साधी प्राजु होती त्याच्या अगदी उलट आहे ही धडाकेबाज पालवी. पालवीचा फप्फा (पप्पा) म्हणजे एरियातला मोठा डॉन दीनकर पाटील (संजय नार्वेकर). त्यात प्राजुचा बाबा लेले (वैभव मांगले) उर्फ शाकाल आहेच. या सगळ्यांचा नेमका झांगडगुत्ता कसा जुळतो आणि त्यातून दगडू आणि पालवीची ही प्रेम कहानी विविध पैलूंमधून रंगत जात सिनेमा घडत जातो. आपण त्यात रमतो ही.
सिनेमात कलाकारांनी आपली कामं एकदम उत्तम केल्यामुळे कथेत असलेल्या त्रुटी तशा दुर्लक्ष करता येतात. हृताने कम्फर्ट झोनच्या बाहेरची भूमिका केली आहे आणि ती तिने इतकी चोख निभावली आहे की ही फालवी 'बोले तो भिडू एकदम कडक'. सोबत प्रथमेश पुन्हा एकदा दगडू म्हणून 'आपल्याला आवडला'. या दोघांना संजय नार्वेकर, वैभव मांगले, भाऊ कदम आणि इतर त्याची उत्तम सोबत लाभली आहे. असं असलं तरीही पहिल्या भागाची मज्जा आणि दुसऱ्या भागात असलेली गंमत कुठेतरी या तिसऱ्या भागात हवी तेवढी मिळत नाही. सिनेमा मनोरंजक नक्कीच आहे. अनेक प्रसंगातून विनोद सुद्धा घडतो पण प्रत्येक विनोद आपल्यापर्यंत पोहोचतोच असं नाही. काही ठिकाणी पहिल्या दोन भागाची आठवण यावी म्हणून काही प्रसंग निर्माण केल्यासारखं सुद्धा वाटतं. कथेत जरा नाविन्य असतं तर अजून अधिक मजा आली असती असं सुद्धा काही ठिकाणी वाटतं.
अगदी थोडक्यात सांगायचं तर, सिनेमाचा प्रभाव चांगला आहे. पण, पहिल्या दोन भागात समोर हा थोडा फिका पडतो असं वाटतं. अगदी शेवटी सिनेमात एक वेगळा ट्विस्ट आहे आणि त्यामुळे उत्सुकता नक्कीच ताणली जाते आणि सिनेमा जाता जाता काहीतरी देऊन जातो. कलाकारांच्या कामामुळे आणि कथेतल्या हलक्या-फुलक्या विनोदामुळे आणि काही नवीन पात्रांमुळे Timepass 3 आपला टाईमपास नक्कीच करतो. एक मनोरंजक राईड म्हणून सिनेमा पाहायला काहीच हरकत नाही. एवढं नक्की की टाईमपास सिरीज मधला हा भाग देखील मनाच्या हिंदोळ्यांवर स्पंदने नक्कीच निर्माण करतो.