'दुर्वा', 'फुलपाखरु' आणि आता 'मन उडू उडू झालं' या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (hruta durgule). आपल्या अभिनयशैलीसह सौंदर्यामुळे अनेक तरुणांना घायाळ करणारी हृता सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. 'मन उडू उडू झालं' या मालिकेत हृता, दिपू ही भूमिका साकारत असून या मालिकेत सध्या तिची आणि इंद्राची लव्हस्टोरी चांगलीच सुपरहिट ठरत आहे. या दोघांमध्ये हळूहळू प्रेमाचा अंकूर फुलत असून तिने पहिल्यांदाच रोमॅण्टिक सीनविषयी तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'मन उडू उडू झालं' या मालिकेमुळे सातत्याने चर्चेत येणाऱ्या हृताने ती रोमॅण्टिक सीन कशा पद्धतीने शूट करते किंवा या सीनचा अनुभव कसा असतो हे अलिकडेच सांगितलं आहे. तसंच या सगळ्याचं श्रेयदेखील तिने एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला दिलं आहे.
'मन उडू उडू झालं' या मालिकेचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी करत आहेत. त्यामुळेच मालिकेतील रोमॅण्टिक सीन करण्याविषयीची सारं श्रेय हृताने त्यांना दिलं आहे."मला पुन्हा एकदा मंदार देवस्थळींसोबत काम करायची संधी मिळाली हे मोठं भाग्याचं आहे. मंदार सरांची काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे. ते प्रत्येक सीनचाएक वेगळा पैलू काढतात आणि तो समजावून सांगतात. एखादा सीन वाचल्यानंतर तो कसा करायचा हा प्रश्न पडला. तर ते लगेचच तो सीन समजावून सांगतात", असं हृता म्हणाली.
पुढे ती म्हणते, "प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याची त्यांची जी पद्धत आहे त्यामुळेच कोणताही सीन असो तो नीट करता येतो. अगदी रोमॅण्टिक सीनदेखील. एखादी प्रेमकथा उत्तमरित्या छोट्या पडद्यावर दाखवणं यात मंदार सरांचा हातखंडा आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही मालिकेचं कथानक अधिक उत्तमरित्या सादर करू शकतो."
दरम्यान, सध्या या मालिकेत इंद्रा आणि दिपू यांच्या लव्हस्टोरीचा ट्रॅक दाखवण्यात येत आहे. अलिकडेच दिपूने इंद्रासमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. परंतु, अद्याप त्यांचं नातं देशपांडे सरांना माहित नाही. त्यामुळेच दिपू-इंद्राचं नातं त्यांच्यासमोर आल्यानंतर मालिकेत नेमकं कोणतं वळण येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.