ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - माझ्यावर रोज कुणी ना कुणी बरं वाईट लिहित असतं, कारण मी सॉफ्ट टार्गेट आहे, असं म्हणत सनी लिऑननं आपण निबर कातडीची नसून मलाही दु:ख होतं, वेदना होतात अशी भावना व्यक्त केली आहे.
हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सनीनं जगात अनाथ मुलांचे, रस्त्यावरच्या कच-याचे, अशिक्षित मुलांचे इतके प्रश्न आहेत, पण मलाच लक्ष्य करून का हल्ला केला जातो असा सवाल विचारला आहे. माझ्यावर विनाकारण हल्ला करणा-या या लोकांचं मिशन काय आहे हेच कळत नसल्याची खंतही तिनं व्यक्त केली आहे.
माझ्याविरोधात मोर्चे काढण्यासाठी पैसे फुकट घालवण्यापेक्षा लहान मुलांसाठी पुस्तकं खरेदी करा असा सल्लाही तिनं दिला आहे.
एका वृत्तवाहिनीवर सनी लिऑनला अत्यंत वाईट पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले, त्यामागे पुरूषी वृत्ती दिसत असल्याचा आरोपही अनेकांनी केला. त्याबाबत बोलताना ती म्हणते, पाच मिनिटातच माझा संयम संपला होता, पण त्या कार्यक्रमातून निघून जाऊन, तो अँकर माझ्याबद्दल जे काही बोलत आहे, ते बरोबर आहे असा ग्रह निर्माण होऊ नये म्हणून मी निघून गेले नाही.
माझा भूतकाळ याआधीही विचारला गेला आहे, परंतु ज्या प्रकारे या कार्यक्रमात त्याचा उल्लेख झाला त्याबद्दल वाईट वाटलं, असं सनी सांगते.
अर्थात, त्या मुलाखतीनंतर मला फिल्म इंडस्ट्रीमधल्या अनेकांनी पाठिंबा दिला, जो याआधी कधीही मिळाला नव्हता असं सनीनं म्हटलं आहे. आमीर खाननेही सनी लिऑनला दिलेल्या पाठिंब्यासाठी तिने आभार मानले आहेत.