डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमामुळे नावारूपाला आलेला धर्मेश सध्या डान्स प्लस या कार्यक्रमात मेन्टॉरची भूमिका साकारत आहे. बँजो या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या नव्या इनिंगबद्दल त्याने सीएनएक्ससोबत मारलेल्या या गप्पा...प्रश्न : डान्स प्लसच्या पहिल्या सीझनचे विजेतेपद तू मिळवले होते. आता दुसऱ्या सीझनची तयारी कशी सुरू आहे?पहिल्या सीझनचे विजेतेपद पटकावल्यामुळे दुसऱ्या सीझनमध्ये मला अधिक दडपण आलेले आहे. पहिल्या सीझनपेक्षा चांगले नृत्य माझ्या टीमने सादर केले पाहिजे यावर सध्या मी मेहनत घेत आहे. या वेळेच्या आॅडिशनला खूपच टॅलेंटेड लोक आले होते. त्यातून काही ठरावीक लोकांचीच निवड करणे हे अतिशय कठीण काम होते. चांगल्यातल्या चांगल्या डान्सरची निवड करून मी माझी टीम बनवली आहे. हे सगळे आपल्या नृत्यातून प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतील हा मला विश्वास आहे. प्रश्न : नृत्यासोबत तू अभिनयातही भाग्य अजमावत आहेस, या प्रवासाविषयी काय सांगशील?मला लहानपणापासून नृत्याची आवड होती. त्यामुळे मी खूप चांगला नर्तक, कोरिओग्राफर बनेन याची मला खात्री होती. पण मी अभिनय करेन असा मी कधी विचारही केलेला नव्हता. एबीसीडी आणि एबीसीडी २ या चित्रपटामुळे माझी अभिनयक्षमता लोकांसमोर मांडता आली. विशेष म्हणजे, या दोन्ही चित्रपटांमध्ये मी डान्सरचीच भूमिका साकारली असल्याने या चित्रपटांमध्ये अभिनय करणे मला कठीण वाटले नाही.प्रश्न : बँजो या चित्रपटात तू नृत्य करताना पाहायला मिळणार नाही असे म्हटले जातेय हे खरे आहे का?बँजो या चित्रपटात मी ड्रम वाजवणाऱ्या एका मुलाची भूमिका साकारत आहे. तो नेहमीच प्रत्येकावर भडकणारा, चिडचिड करणारा, लोकांशी उर्मट वागणारा असा आहे. मी माझ्या आयुष्यात यापेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याने ही भूमिका साकारणे आव्हानात्मक होते. पण दिग्दर्शक रवी जाधव, रितेश देशमुख या सगळ्यांनीच मला चांगले मार्गदर्शन दिले. त्यांच्यामुळेच मी ही भूमिका चांगल्याप्रकारे साकारू शकलो, असे मला वाटते. या चित्रपटात माझे एकही नृत्य नसणार असेच ठरले होते. पण मी माझ्या नृत्यासाठी ओळखला जात असल्याने एक तरी नृत्य असावे असे रवी जाधव यांचे म्हणणे होते. त्यामुळे संपूर्ण चित्रपटात केवळ १० सेकंद मी नृत्य करणार आहे. हे १० सेकंदांचे नृत्य मी स्वत: कोरिओग्राफ केलेले आहे. प्रश्न : तू एका रिअॅलिटी शोमधून आलेला आहेस, रिअॅलिटी शोच्या स्पर्धकांना त्यांच्या भविष्यासाठी फायदा होतो असे तुला वाटते का?कोणताही रिअॅलिटी शो हा तुम्हाला केवळ प्लॅटफॉर्म मिळवून देतो. भविष्यात कशा प्रकारचे काम करायचे हे तुम्ही तुमचे ठरवायचे असते. काम करण्याची भूक ज्यांच्यात असते, ते यशस्वी ठरतात. जे केवळ ग्लॅमरच्या मागे धावतात, आपल्याला मिळालेल्या त्याच यशात समाधान मानतात, मेहनत घेत नाहीत त्यांना अपयशाला सामोरे जावे लागते असे मला वाटते. प्रश्न : तू आता अभिनयातही करिअर करण्याचे ठरवले आहेस का?मला चांगल्या भूमिका आॅफर झाल्या तर त्या नक्कीच करायच्या मी ठरवले आहे. बँजो या चित्रपटानंतर मी एबीसीडी ३ या चित्रपटात झळकणार. तसेच एक गुजराती भाषेतील चित्रपटही मी करत आहे.
- prajakta.chitnis@lokmat.com