Join us

असा झालो 'अशोक मामा'....! खुद्द स्वतःच केला खुलासा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 6:00 AM

Ashok Saraf : अशोक सराफ यांना सर्वजण अशोक मामा अशी हाक मारतात. त्यांना मामा म्हणायला कोणी आणि कशी सुरुवात केली, याचा खुलासा त्यांनी केला होता.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजही त्यांचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. त्यांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळते. त्यांच्या कामासोबतच ते त्यांच्या प्रेमळ स्वभावासाठीही ओळखले जातात. सर्वजण त्यांना अशोक मामा अशी हाक मारतात. त्यांना मामा म्हणण्याची सुरुवात कुठून झाली हे त्यांनी काही वर्षांपूर्वी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील खुपते तिथे गुप्ते हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची दोन पर्व यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर अनेक वर्षांनी आता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचे तिसरे पर्व ४ जूनपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने झी मराठीने या कार्यक्रमाच्या आधीच्या पर्वाच्या एका एपिसोडची छोटीशी झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडीओत अशोक सराफ यांनी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमात अवधुत गुप्तेने अशोक सराफ यांना विचारले की, तुम्हाला मामा म्हणण्याची सुरुवात कुठून झाली?. त्यावर अशोक मामांनी याचा खुलासा केला होता.

अशोक मामा म्हणाले होते, कोल्हापूरकडे ‘मामा’ म्हणणं हे लोक खूप मानाचे समजतात. एका चित्रपटाचे तिथे शूटिंग करत असताना आमचा कॅमेरामॅन त्यांच्या छोट्या मुलीला एकदा सेटवर घेऊन आला आणि तिला म्हणाला, हे बघ…हे कोण? हे अशोक मामा. त्या लहान मुलीला मला मामा म्हणायला सांगताना तोच मला मामा म्हणू लागला. तिथे बाकी सगळे स्पॉट बॉईज आणि काम करणारी मंडळी होती त्यांना मला काय म्हणायचं हा प्रश्नच होता. साहेब म्हणणं त्यांना लांबचं वाटत होतं आणि अशोक तर ते म्हणू शकत नव्हते. म्हणून मग त्यांनीही मला मामा म्हणायला सुरुवात केली. यानंतर मला सगळे मामा म्हणून लागले की आता शूटिंग पाहायला आलेली लोकही मला मामा म्हणतात. लोक मला मामा म्हणतात याचे मला सुख जास्त वाटते.

अशोक सराफ यांचा व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे. यावर कमेंट करत त्यांचे चाहते हा व्हिडीओ आवडल्याचे सांगत आहेत.

टॅग्स :अशोक सराफ