अन् मी मुंबई आलो... जसं रात्रीत उचलून अमेरिकेत टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 07:41 AM2022-07-24T07:41:03+5:302022-07-24T07:43:05+5:30

मी मुंबईत सुरुवातीची सुमारे ४ वर्षं आईची मैत्रीण साधना पुरोहित ह्यांच्या घरी चेंबूरला रहात होतो

I came to Mumbai... as if picked up in the night and dropped in America | अन् मी मुंबई आलो... जसं रात्रीत उचलून अमेरिकेत टाकलं

अन् मी मुंबई आलो... जसं रात्रीत उचलून अमेरिकेत टाकलं

googlenewsNext

मूळचा अस्सल कोल्हापुरी. राजारामपुरी १२ व्या गल्लीत बाईच्या पुतळ्याजवळ माझं घर. १९९७ साली दहावी कशीबशी पास होऊन मी विद्याताई पटवर्धनांच्या बालनाट्य शिबिरासाठी मुंबईत आलो. तत्पूर्वी हृषीकेश जोशी ने गौतम मुजुमदारांसोबत आयोजित केलेल्या मूकाभिनयाच्या शिबिरात सहभागी झालो होतो. कोल्हापुरात डॉ शरद भुताडियांच्या “प्रत्यय” आणि हृषीकेश जोशींच्या “अभिरुची” ह्या हौशी नाट्यसंस्थांतर्फे छोटीमोठी काम केली होती.  विद्याताईंच्या शिबिरात भेटलेल्या मित्रांनी आग्रह केला की कुठे परत कोल्हापूरला जातोस, रहा मुंबईतच .... इथे बरंच काही काम करता येईल, आणि मी इथे राहिलो तो आजतागायत !  

मी मुंबईत सुरुवातीची सुमारे ४ वर्षं आईची मैत्रीण साधना पुरोहित ह्यांच्या घरी चेंबूरला रहात होतो. त्यानंतर आजपर्यंत जवळपास २२ घरं बदलली आहेत. जवळपास पूर्ण मुंबई माझी राहून आणि फिरून झाली आहे. मी मुंबईत आल्यावर रुपारेल कॉलेजला प्रवेश घेतला होता. तिथेही आय एन टी, मृगजळ, इत्यादी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत हिरीरीने सहभागी होत होतो. तेव्हा चेंबूर ते सेनाभवन दादर हा प्रवास मी ९० मर्यादित किंवा ५२१ ह्या बेस्ट बसनेच करायचो. एकदाच माझा मित्र राजू सावंत ह्याच्या आग्रहाखातर दादरहून ट्रेनने सायनला उतरलो आणि चेंबूरला जाण्यासाठी बस सोडा चालतही रस्ता सापडेना. कुर्ला, चुनाभट्टी झोपडपट्टी असं करत रात्री कधीतरी प्रियदर्शिनी चौकात पोचलो आणि तिथून मग चेंबूरला. मी काही काळ एका वामा कम्युनिकेशन नामक जाहिरात एजंसी मध्ये नाटकांच्या जाहिराती वर्तमानपत्रांना पोचवायचं काम केलं होतं. त्यासाठी ट्रेनने जात असताना एकदा ट्रेनच्या बाहेरून एका माणसाने फटका मारून माझ्या हातातली जाहिरातींचे ब्रोमाइड्स असलेली पिशवी पळवली होती. अनेकदा मोबाईल चोरीला गेले आहेत. मुंबईतले ट्रेनचे प्रवास कायमच लक्ष्यात रहाणारे ठरले आहेत.

एखाद्या माणसाला एका रात्रीत उचलून अमेरिकेत टाकलं तर कसं वाटेल तसं मला १९९७ साली झालं होतं, इथली गर्दी, इथला वेग सगळंच नवं आणि अनाकलनीय होतं. पण आता मी रुळलो आहे. आता मुंबईत आईच्या पोटात जितकं सुरक्षित आणि पोषक वातावरण असतं तसं सुरक्षित वाटतं. जुन्याचा आदर आणि नव्याचे स्वागत असा अप्रतिम समतोल इथल्या संस्कृतीत, व्यावसायिकतेत, इथल्या वातावरणात आहे. माझं मुंबईवर जीवापाड प्रेम आहे, मी मुंबई सोडून बाहेर राहण्याचा विचारही करू शकत नाही.
- शब्दांकन 
तुषार श्रोत्री

Web Title: I came to Mumbai... as if picked up in the night and dropped in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.