क्रिकेट वर्ल्डकप १९८३ भारतासाठी विशेष होता. बलाढ्य वेस्ट इंडिज टीमला फायनलमध्ये चारीमुंड्या चीत करत कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय टीमने वर्ल्डकप जिंकण्याचा भीमपराक्रम केला होता. या ऐतिहासिक विजयामुळे तमाम भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. कपिल देव यांच्या त्या भारतीय टीमचं नाव सुवर्णाक्षरांनी क्रिकेट इतिहासात नोंदवलं गेलं. आता भारतीय क्रिकेट टीमचा पहिला वर्ल्डकप जिंकल्याचा हाच पराक्रम रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. ८३ नावाचा हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिखही समोर आली आहे.
महाराष्ट्र सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी दिल्यामुळे 83 चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर झाली आहे. पुन्हा एकदा कलाकार मंडळी चित्रपटाविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगत प्रमोशन करत आहेत. अभिनेता ताहीर राज भसिनही जिथे जातो तिथे चित्रपटाविषयी बोलत असतो. सुपरस्टार रणवीर सिंग आणि कबीर खान दिग्दर्शित 24 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शनाची तारीख मिळवणे केवळ मोठ्यात मोठ्या ब्रँड्सच्या चित्रपटांनाच शक्य होते.
83 चित्रपटात सुनील गावसकर यांची भूमिका साकारणारा ताहिर सांगतो, “83 कधी एकदा थिएटर्समध्ये सुरू होतो आहे याचीच मी वाट पाहतो आहे. थिएटरलाही स्टेडियमचे रुप मिळेल असाच अनुभव रसिकांना आल्याशिवाय राहणार नाही, आपण सगळे जिथे भारताच्या विजयासाठी घोषणा देतो, त्या क्रिकेट स्टेडिअममध्येच आपण बसलोय की काय अशीच अनुभूती देण्याची क्षमता या फिल्ममध्ये आहे.” “सुट्टीच्या काळात प्रदर्शित होत असल्यामुळे रसिकांसाठी चांगला पर्याय हा चित्रपट ठरु शकतो.”ताहीर लूप लपेटा या रोमँटिक फिल्ममध्ये तापसी पन्नूसोबत दिसणार आहे, यह काली काली आँखे या चित्रपटात तो श्वेता त्रिपाठीसोबत काम करत आहे.