Join us

इंडस्ट्री सोडण्याचा मी निर्णय घेतला होता: दिव्या दत्ता

By admin | Published: October 19, 2016 2:21 AM

अभिनेत्री दिव्या दत्ताने वीरजारा, भाग मिल्खा भाग, देल्ही 6 यासारख्या चित्रपटांत साकारलेल्या भूमिकांचे प्रेक्षकांनी, समीक्षकांनी प्रचंड कौतुक केले

अभिनेत्री दिव्या दत्ताने वीरजारा, भाग मिल्खा भाग, देल्ही 6 यासारख्या चित्रपटांत साकारलेल्या भूमिकांचे प्रेक्षकांनी, समीक्षकांनी प्रचंड कौतुक केले आहे. सध्या ती चित्रपटात काम करण्यासोबतच सावधान इंडिया या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत आहे. तिच्या या सूत्रसंचालनाच्या अनुभवाविषयी तिने सीएनएक्सशी मारलेल्या गप्पा...अभिनय करीत असताना कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचा विचार कसा केलास?माझा आवाज हा इतरांपेक्षा खूप वेगळा पण छान आहे, अशी अनेक जण माझी स्तुती करतात. माझ्या आवाजामुळे मला सूत्रसंचालनाच्या अनेक आॅफर काही वर्षांपासून येत होत्या; पण मी एखाद्या चांगल्या कार्यक्रमासाठी थांबले होते. सावधान इंडिया या कार्यक्रमाद्वारे समाजात एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो, ही गोष्ट मला आवडल्याने मी त्या कार्यक्रमाचा भाग व्हायचे ठरवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायला लागल्यापासून एक व्यक्ती म्हणून माझ्यात अनेक बदल झाले आहेत. मी अधिक सतर्क झाले आहे. तसेच, आपण एक जबाबदार नागरिक असून समाजात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे, याची मला जाणीव झाली आहे. तुझ्या आयुष्यात तू न घाबरता समस्यांना सामोरी जाते का?मी पंजाबमध्ये लहानाची मोठी झाले असल्यामुळे तिथे मुलांनी सतावणे, चिडवणे या गोष्टी मी लहानपणापासूनच पाहत आले आहे. मी माझ्या आईला दिवसभरात घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगत असे. त्यामुळे माझ्या शालेय जीवनात अशी घटना कधी घडली नाही; पण मी कॉलेजमध्ये असताना एक मुलगा माझ्या सतत मागे येत असे. मी इतकी घाबरले होते, की आईला सांगायचीदेखील माझी हिंमत झाली नाही. एकदा कंटाळून आता मी कॉलेजलाच जाणार नाही, असे मी आईला सांगितले. त्यावर काहीतरी गोष्ट घडली आहे, हे आईच्या लक्षात आले आणि तिने मला विचारले. त्या वेळी मी तिला त्या मुलाविषयी सांगितले. त्यावर माझ्या आईने ‘तू न घाबरता त्याला सामोरी जा’ असे मला सांगितले. मी रोजच्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी कॉलेजला निघाले, तेव्हा तो तिथेच उभा होता. माझी आई माझ्यापासून काही अंतरावर दूर उभी होती. मी त्या मुलाच्या जवळ गेले आणि त्याच्या कानाखाली वाजवली. मी त्याला मारले हे पाहिल्यानंतर आजूबाजूचे लोक तिथे आले आणि त्यांनीदेखील त्याची चांगलीच धुलाई केली. यानंतर माझ्या आईनेही त्याला सुनावले. या घटनेनंतर कोणत्याही गोष्टीला न घाबरता सामोरे जायचे, ही गोष्ट मी शिकले.मुंबई हे शहर कितपत सुरक्षित आहे, असे तुला वाटते?मी अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहे. मुंबईत तुम्ही कितीही रात्री एकटे बाहेर फिरू शकता, असे मला वाटते. काही दिवसांपूर्वी नवरात्रीत मी खूप रात्री गाडी चालवत घरी चालले होते. माझ्या बाजूने मिरवणूक जात होती. त्यातील प्रत्येकजण आपल्या धुंदीत नाचत होता; पण कोणीही कोणत्याही मुलीला त्रास देत नव्हता. त्यामुळेच मुंबई ही खूपच सुरक्षित आहे, असे मला नेहमी वाटते. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना तुझा चित्रपटसृष्टीतील प्रवास कसा सुरू झाला?मला अभिनेत्री व्हायचे आहे, असे मी लहानपणीच ठरवले होते. शाळेतदेखील तुला काय बनायचे आहे, असे कोणी मला विचारले तर ‘मला अभिनेत्री बनायचे आहे’ हेच उत्तर मी देत असे. अनेक वेळा या उत्तरामुळे मला शाळेत ओरडादेखील खावा लागत असे; पण माझ्या या निर्णयाला माझ्या आईने नेहमीच पाठिंबा दिला. मी एक स्पर्धा जिंकून मुंबईत आले होते. ही स्पर्धा जिंकल्यामुळे मला त्यांच्याकडून ट्रेनिंग देण्यात आले होते. तसेच, माझा पोर्टफोलिओदेखील त्यांनीच बनवला होता. यानंतर सुनील शेट्टीसोबत सुरक्षा या चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्या अभिनयप्रवासाला सुरुवात झाली.केवळ वेगळ्या साच्यातील भूमिका साकारायच्या, हा निर्णय तू कधी घेतलास?मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खूपच टिपिकल भूमिका साकारत होते. त्या भूमिका साकारताना मला कोणतेच समाधान मिळत नव्हते. त्यामुळे काहीतरी वेगळे करण्याचे मी ठरविले. मला वेगळ्या भूमिका नाही मिळाल्या, तर मी पंजाबला परत जाणार असेदेखील मी मनाशी ठरवले होते. पण, त्यानंतर मला चांगल्या मालिका मिळाल्या. त्यातील भूमिका प्रेक्षकांना आवडल्या. यश चोप्रा यांनी वीरजारा चित्रपटातील भूमिकेसाठी माझी निवड केली आणि त्या चित्रपटानंतर माझ्या करिअरला एक वेगळेच वळण मिळाले. भाग मिल्खा भाग, देल्ही 6 या चित्रपटांनी तर मला एक वेगळी ओळख मिळवून दिली.