दोन राष्ट्रीय पुरस्कार, दोन फिल्मफेअर पुरस्कार पटकावत आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा अभिनेता अशी मनोज वाजपेयीची ओळख. ‘सत्या’मधला भिकू म्हात्रे असो किंवा मग नुकतेच काही दिवसांपूर्वी झळकलेला ‘अलीगढ’ सिनेमातील प्राध्यापक असो. प्रत्येक भूमिकेत आपल्या संवेदनशील आणि दमदार अभिनयाने जीव ओतणारा अवलिया म्हणजे मनोज वाजपेयी. ‘सात उचक्के’ या सिनेमाच्यानिमित्ताने मनोज वाजपेयीशी सीएनएक्स लोकमतने मनमोकळ्या गप्पा मारल्या...‘सात उचक्के’ या शीर्षकावरूनच सिनेमा काहीसा वेगळा वाटतोय. या सिनेमाबद्दल जाणून घ्यायला आवडेल?- माझ्या जीवनात मी आजवर विविध सिनेमांमध्ये काम केले आहे. प्रत्येक सिनेमाचे एक वेगळेपण होते. मात्र माझ्या आजवरच्या जीवनातला हा वेगळा सिनेमा आहे. खूप कमी कलाकार असतात, की ज्यांना आपल्या आवडत्या आणि मनासारख्या भूमिका साकारण्याची संधी मिळते. मी स्वत:ला भाग्यवान समजतो, की मला माझ्या आवडीची भूमिका करण्याची संधी या सिनेमाच्यानिमित्ताने मिळाली. या सिनेमात रसिकांना जुनी दिल्ली पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर रसिकांना जुन्या दिल्लीला एकदा तरी भेट द्यावी, असे वाटेल. जुन्या दिल्लीतले लोक वेगळे आहेत. त्यांची संस्कृती वेगळी आहे. स्वभाव, खाणं-पिणं, बोलणं-चालणं सारे काही वेगळे आहे. त्यांचा हाच वेगळा अंदाज या सिनेमात पाहायला मिळणार आहे. एखादा सिनेमा साईन करण्याआधी तू कोणत्या गोष्टीचा विचार करतोस. त्या सिनेमाची बॉक्स आॅफिस व्हॅल्यू की सिनेमाची कथा?- सुरुवातीपासूनच मी ठरवले आहे, की जे मनाला पटेल, जे मनाला भावेल तेच करायचे आणि आजवर मी तेच करीत आलोय. आजवर बॉक्स आॅफिस व्हॅल्यू लक्षात घेऊन कोणत्याही सिनेमात काम केलेले नाही. सिनेमाची कथा चांगली होती, काम चांगले होते, मात्र बॉक्स आॅफिसवर सिनेमाला यश मिळाले नाही, तर तुम्ही कितीही चांगले काम केले, याला महत्त्व नसते. खोटे सांगत नाही सिनेमा चालला नाही तर तुम्ही कितीही चांगले काम करा सारे व्यर्थ असते असे मला वाटते.तुझे आणि दिल्लीचे एक वेगळे नाते आहे. या सिनेमाच्या निमित्ताने काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या?- दिल्लीत माझा जन्म झाला नाही, इथे वाढलो नाही तरीही दिल्लीशी एक वेगळे नाते आहे. कारण इथं मी काही वर्षे थिएटर केले आहे. आता माझे कुटुंब दिल्लीत राहते. मात्र ज्या वेळी मी दिल्लीत आलो त्या वेळची दिल्ली खूप वेगळी होती. वयाच्या १७ व्या वर्षी दिल्लीत आलो त्या वेळी जे जे मी अनुभवले, जी दिल्ली पाहिली ती या सिनेमात आपल्या अभिनयाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.या सिनेमात शिव्या आणि द्वैअर्थी शब्दप्रयोग आहेत. त्यामुळे सेन्सॉरमध्ये सिनेमा अडकला होता, तर सेन्सॉरविषयी तुझे काय म्हणणे आहे?- सिनेमांवर सरसकट बंदी हे अयोग्य आहे असे वाटते. सिनेमात सेन्सॉरने कट सुचवावे की मग थेट बंदी घालावी. नक्की काय करायचं, याची एक प्रक्रिया असावी, त्यावर चर्चा आणि विचार व्हावा असे वाटते. या सिनेमात तू के. के. मेननसोबत काम केले आहे. असे बोलले जातेय, की तुमच्या दोघांमध्ये काही स्पर्धा होती, तणाव आहे तर यात कितपत तथ्य आहे?- या चर्चांमध्ये बिल्कूल तथ्य नाही. के. के. मेननसारख्या कलाकारासोबत काम करणे, विविध विषयांवर एकमेकांची मतं विचारात घेणे खरेच चांगले वाटले. के. के. मेनन एक हुशार, सगळ्या गोष्टींची जाण असलेला, अनुभवी कलाकार आहे. त्याच्यासोबत काम करताना नवनवीन गोष्टी शिकता आल्या. कुठल्याही प्रकारच्या स्पर्धेची किंवा ईर्षेची भावना नव्हती.
मी हिट-फ्लॉपच्या समीकरणात पडत नाही
By admin | Published: October 10, 2016 2:59 AM