मानुषी छिल्लर म्हणते शाकाहार उत्तम आहार, जाणून घ्या यामागचे खास कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 01:37 PM2021-04-22T13:37:56+5:302021-04-22T13:40:52+5:30
मानुषी छिल्लर वसुंधरा दिन (अर्थ डे) साजरा करताना सांगतेय की शाकाहारी असण्याने आपल्या पृथ्वीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या फिटनेससाठी खूपच जागरुक असतात. ज्यामुळे अनेकांना त्याच्या आवडत्या नॉन व्हेज फुड पासून दूर राहावं लागतं. पण बॉलिवूडमध्ये काही असेही सेलिब्रेटी आहेत जे पूर्णतः शाकाहारी आहेत. यात अभिनेत्री मानुषी छिल्लरचाही नावाचा समावेश झाला आहे. कारण मानुषीलाही वाटतं शाकाहार हाच उत्तम आहार. मानुषी छिल्लर वसुंधरा दिन (अर्थ डे) साजरा करताना सांगतेय की शाकाहारी असण्याने आपल्या पृथ्वीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
सगळ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) इंडियाने पृथ्वीराज सिनेमाच्या या नायिकेसोबत सहकार्य केले आहे. पेटा आता मानुषीसोबत एक राष्ट्रीय स्तरावरील मोहीम राबवत आहे. यात ती ब्रोकोली, अॅस्परॅगस आणि टोमॅटोंनी बनलेला मुकुट घालून शाकाहारी बनण्यासंदर्भात संदेश देणार आहे.
प्रियंका चोप्रानंतर तब्बल 17 वर्षांनी मानुषीने भारताला मिस वर्ल्डचा किताब मिळवून दिला. ती म्हणाली, "शाकाहारी असणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. अनेक वर्षांपूर्वी मी हा निर्णय घेतलाय. माझ्या एकूण फिटनेसवर काय परिणाम होतो, हे पहायचे होते." ती म्हणाली, "अन्न ही वैयक्तिक आवडनिवड आहे आणि आपल्याला स्वत:साठी काय योग्य वाटतं तेच आपण खायला हवं. पण पेटा इंडियामधील माझा मित्रपरिवार आणि मी प्रत्येकालाच यंदाच्या अर्थ डेला आणि त्यांना वाटल्यास त्यानंतरही मांसमुक्त बनण्याचा प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देणार आहोत."
युनायटेड नेशन्सच्या फूड एण्ड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या मते प्राण्यांच्या शेतीचा म्हणजे आहारासाठी त्यांची वाढ, पैदास, कत्तल या प्रक्रियांचा जागतिक ग्रीन हाऊस उत्सर्जनात १४.५ टक्के वाटा आहे. जगातील सर्व वाहतूक व्यवस्था एकत्रित जितका परिणाम करते त्याहून हे अधिक आहे.
इतकेच नाही, प्राण्यांच्या शेतीसाठी जगातील एक तृतीयांश वापरण्याजोगे पाणी वापरले जाते आणि जगभरातील शेतजमिनीतील एक तृतीयांश भाग वापरला जातो. पाण्याच्या दुर्भिक्ष्याने पृथ्वीवर आताच मोठी समस्या निर्माण केली आहे. पाण्याची अत्यंत टंचाई असलेल्या देशांमध्ये दोन अब्जांहून अधिक लोक राहतात आणि 690 दशलक्ष लोक आजही उपाशी आहेत.