कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातल्यानंतर अनेक देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. भारतात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशाच्या विविध भागात राहाणारे मजूर आपल्या घरात परतण्याचा प्रयत्न करू लागले होते. रेल्वे, बस यांसारखी सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेकांना चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा मजुरांना सोनू सुदने स्वतः खर्च करत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले. त्यामुळे चित्रपटांमध्ये खलनायकाचे काम करणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात नायक बनला.
सोनू सूदने लोकांना लॉकडाऊनच्या काळात प्रचंड मदत केली. सोनू सूदने केलेल्या समाजसेवेनंतर आता तो राजकारणात देखील प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून रंगली आहे. याबाबत आता त्यानेच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. सोनूला बॉलिवूड हंगामाच्या मुलाखतीत विचारण्यात आले की, आजवर अनेक अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. तुझा राजकारणात प्रवेश करण्याचा काही विचार आहे का. त्यावर त्याने सांगितले की, एक अभिनेता म्हणून मला खूप काही करायचे आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी माझी अनेक स्वप्नं होती. त्यातील काही आजही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे ती स्वप्नं पूर्ण करण्याचा मला भविष्यात प्रयत्न करायचा आहे. राजकारणात प्रवेश करण्याचे वय कोणतेही असू शकते. मला १० वर्षांपूर्वी राजकारणात येण्याची ऑफर आली होती. पण त्यावेळी मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मला आजही अनेक ऑफर येतात.पण त्यात मला सध्या तरी रस नाहीये.
या मुलाखतीत पुढे त्याने सांगितले की, मी ज्या क्षेत्रात पारंगत आहे, ज्या कामाला योग्य न्याय देऊ शकतो तेच काम करावे असे मला वाटते. मला एखादी जबाबदारी राजकारणात देण्यात आली. पण मी माझ्या कामामुळे लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही तर त्याचा काय उपयोग... सध्या मला एक अभिनेता म्हणून खूप काही मिळवायचे आहे.