स्टार प्लसवरील ‘दिव्य दृष्टी’ या आगळ्या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून त्यातील कलाकारांच्या अभिनयाची प्रेक्षकांकडून प्रशंसा केली जात आहे. त्यातील नामवंत कलाकार आणि मालिकेचे वैशिष्ट्यपूर्ण आणि भव्य कथानक यामुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. या मालिकेत देखणी अभिनेत्री संगीता घोष ही रूप सुंदर परंतु खलप्रवृत्तीच्या पिशाचिनीची भूमिका साकारीत आहे. तिच्या अंगी काही अमानवी शक्ती असल्या तरी तिला दिव्या आणि दृष्टी या दोन बहिणींकडील एक खास शक्ती हवी असते.
गेली अनेक वर्षे अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या संगीता घोषने आपल्या मेहनती स्वभावाने आणि वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. अगदी लहान असल्यापासून संगीताने अभिनयास प्रारंभ केला होता, ही गोष्ट बऱ्याच जणांना ठाऊक नाही. याबाबत संगीताने सांगितले, “मी १० वर्षांची असल्यापासून अभिनय करीत आहे.खरेतर मी लाजाळू मुलगी होते, पण अभिनय हा माझ्या रक्तातच होता. कॅमेऱ्याच्या समोर उभी राहिली की मनातून आनंदित व्हायची आणि तेव्हाच मी ठरवले की मोठेपणी आपल्याला अभिनयच करायचा आहे. मी अभिनयाच्या कारकीर्दीची प्रारंभ एका मालिकेतून केला आणि नंतर मी अनेकत जाहिरातींमध्ये मॉडेलिंगचे काम केले. पण माझ्याआवडीची ही गोष्ट करीत असताना मी माझे शिक्षण पूर्ण केले. तेही तितकेच महत्त्वाचे होते. २००१ मध्ये मला ‘देस में निकला होगा चाँद’ या मालिकेत पम्मीची भूमिका मिळाली आणि तिथून माझ्या कारकीर्दीने कलाटणी घेतली. तेव्हापासून मी कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर मला अनेक शक्तिशाली आणि दीर्घ भूमिका मिळू लागल्या. आता मी जेव्हा माझ्या कारकीर्दीकडे वळून बघते, तेव्हा गेल्या 30 वर्षांत मी जे निर्णय घेतले, ते किती योग्य होते, ते पाहून मला आनंद होतो. मी आजवर अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या असून त्या सर्व मला अतिशय प्रिय आहेत. मला अभिनय करीत राहायला आवडते आणि मला कधीच निवृत्त व्हावेसे वाटत नाही.”आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि तसे राहिल्यास जगात तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही, असे सांगितले जाते.