प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया दीर्घकाळापासून आत्म-प्रेम आणि स्वीकृतीची समर्थक आहे. Nickelodeon’s Together for Good campaign #OneOfAKindसाठी नुकत्याच झालेल्या चर्चासत्रादरम्यान नेहाने सांगितले की, जेव्हा ती आई झाली आणि प्रसूती पश्चात नैराश्याशी झुंज देत होती तेव्हा तिला स्वप्रेमाचा खरा अर्थ समजला.
नेहा म्हणाली की, मातृत्वाच्या प्रवासात प्रसूतीपश्चात नैराश्याशी लढत असताना मला स्वप्रेमाचा अर्थ समजला; पण माझ्या मुलांनी माझ्या अस्तित्वाला अर्थपूर्ण बनवले. पालक म्हणून आपण चांगली उदाहरणे समोर ठेवली पाहिजेत. आपल्या मुलांना स्वत:चे व्यक्तिमत्त्व स्वीकारून समाजाच्या अपेक्षांच्या पलीकडे पाहण्यास मदत केली पाहिजे.
नेहाच्या पालकांनी तिचे संगोपन करताना जपलेली मूल्ये आणि कल्पना तिने आपल्या मुलांच्या बाबतीतही जपल्या आहेत, असे सांगतानाच नेहाने सैनिक असलेल्या वडिलांसोबत मोठे होतानाचा अनुभव सांगितला. मुलांसोबत चांगला वेळ घालवण्याचे महत्त्व अधोरेखित करून तिने डिजिटल युगातील पालकत्वाविषयीचे तिचे विचारही मांडले. “माझ्या पालकांनी एक साधा फोन घेऊन दिला होता. त्यानंतर एकत्र असतानाही उपकरणांमध्ये मग्न असलेल्या कुटुंबातील सदस्यांना मी पाहिले आहे. दिवसातून किमान एकदा तरी कुटुंबासोबत मनापासून जेवण करणे आणि मुलांकडे पुरेसे लक्षण देणे मला महत्त्वाचे वाटते,” नेहा पुढे म्हणाली. नेहाचा संदेश सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी महत्त्वाचा ठरतो. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा स्वीकार आणि स्वप्रेम यांना प्राधान्य देण्यामुळे आनंदी आणि निरोगी आयुष्य जगता येते हेच तिच्या संदेशातून समजते.