Join us

...म्हणून मला आठ तासांची झोप लागते; अक्षय कुमारचा संघर्ष, पहिली कमाई २०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 7:03 AM

तुमच्याकडे पैसा कमी असो किंवा जास्त तुम्ही कायम हसत राहा. कारण खुशी ही तुमची सर्वांत मोठी संपत्ती आहे

माझा इथपर्यंतचा प्रवास हा निश्चितच सोपा नव्हता. अनेक अडचणी आल्या. टीका झाल्या, पण मी काम सोडले नाही. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाच्या आधारे मी सांगतो की, तुमच्या करिअरमध्ये नशिबाबरोबरच कष्टही महत्त्वाचे असते. चित्रपट निर्मितीचे काम हे प्रचंड मेहनतीचे असते. माझे अनेक चित्रपट चालले नाहीत. ज्यासाठी मी खूप मेहनत घेतली, पण तरीही मी थांबलो किंवा काम बंद केले असे नाही, तर मी निरंतर काम करीत आहे, ते सुरू ठेवीन. 

अलीकडे मी वर्षभरात मी चारच चित्रपट करतो, पण त्यासाठी खूप मेहनत घेतो. मला माझ्या वडिलांनी शिकविले की, कुणाचे ओझे अंगावर ठेवायचे नाही आणि प्रामाणिकपणा सोडायचा नाही. म्हणून मी प्रामाणिकपणे कमाई करतो. त्या बदल्यात कर भरतो. ज्या समाजाने मला हे सर्व वैभव दिले. त्यांची गरजेनुसार सेवा करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला आठ ते सव्वाआठ तासाची शांत झोप लागते. मी पैशांच्या मागे कधी धावत नाही. कारण जेवढं हातावर बसेल तेवढंच आपल्या पोटाला लागतं.  

चांगल्या सवयी टिकवून ठेवाआपल्या आई-वडिलांनी बालपणापासूनच आपल्याला अनेक चांगल्या सवयी लावलेल्या असतात, पण मोठे झाल्यावर आपण त्या सवयींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून देतो, पण चांगल्या सवयी टिकवून ठेवल्या पाहिजेत. 

पहिली कमाई २०० रुपये मी कोलकातामध्ये पहिली नोकरी केली.  एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये वस्तूंची ने-आण करण्याचे काम मी करत होतो. यातून मला १५० ते २०० रुपये एवढा पगार मिळत होता. त्यानंतर मी ढाका येथे गेलो. तेथे एका हॉटेलमध्ये काम केले. पुढे बँकॉक त्यानंतर दिल्लीला गेलो. दिल्लीत मी आर्टिफिशियल ज्वेलरी विकायचे काम केले. दिल्लीतून ज्वेलरी खरेदी करून मुंबईत विकायचो. 

सर्वांत मोठी संपत्ती खुशीकामापेक्षाही मला माझी आठ तासांची पूर्ण झोप, माझी प्रकृती आणि माझा परिवार हा महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे मी त्यांना प्राधान्य देतो.  तुमच्याकडे पैसा कमी असो किंवा जास्त तुम्ही कायम हसत राहा. कारण खुशी ही तुमची सर्वांत मोठी संपत्ती आहे.

 

टॅग्स :अक्षय कुमार