द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू, दिया मिर्झा, पावेल गुलाटी हजेरी लावणार आहेत. ते त्यांच्या ‘थप्पड’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत.
‘थप्पड’ या चित्रपटातील कलाकार त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी गप्पा मारणार आहेत. त्याचसोबत या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा सेटवरील अनेक सिक्रेट्स कपिल आणि त्याच्या टीमसोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसायला मिळणार यात काहीच शंका नाहीये. ‘थप्पड’मधील कानाखाली मारतानाचे दृश्य चित्रित करताना सहापेक्षा जास्त रिटेक द्यायला लागले या तापसीने केलेल्या खुलाशामुळे धमाल गप्पाटप्पांना सुरुवात झाली.
कलाकारांसोबत गप्पा मारताना कपिल शर्माने त्यांना विचारले की, त्यांना एखाद्या कलाकारासोबत फोटो काढावासा वाटतो का, त्यावर तापसीने सांगितले, “मी हृतिक रोशनची मोठी चाहती आहे. दियाच्या वाढदिवसाला मला त्याच्यासोबत सेल्फी काढायचा आहे असे मी तिला सांगितले आहे. पण केवळ फोटो काढण्याऐवजी मला त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्याच्यासोबत काम करण्याची मी आतुरतेने वाट पाहात आहे.”
ती पुढे म्हणाली, “मला आपले सगळेच भारतीय क्रिकेटर प्रचंड आवडतात. त्यांच्यासोबत मला फोटो काढायला नक्कीच आवडेल. ते खरोखर आपल्या देशाचे हिरो आहेत.”
तापसीला नुकताच फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) पुरस्कार मिळाल्याबद्दल कपिलने तिचे अभिनंदन केले तेव्हा तापसीने त्याचे आभार मानले आणि याचे श्रेय त्याच्या शो ला दिले. तिने सांगितले की, “मी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये माझ्या चित्रपटाचे प्रमोशन केले होते. त्यामुळे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मला मिळाला. म्हणूनच ‘थप्पड’चे प्रमोशन करण्यासाठी मी पुन्हा ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये आले आहे.”