अभिनेत्री तेजस्विनी पंडित (tejaswini Pandit) मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी कलाविश्वात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ती अभिनया व्यतिरिक्त बेधडक विधानांसाठी ओळखली जाते. आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर ती आपलं परखडपणे मत मांडताना दिसते. दरम्यान आता नुकतेच नवरात्रीच्या निमित्ताने तेजस्विनीने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. त्यात तिने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. याशिवाय तिने राज ठाकरेंबद्दल तिला वाटत असलेली इच्छा देखील बोलून दाखवली. तिला राज ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेलं पाहायचे असल्याचे यावेळी सांगितले.
तेजस्विनी पंडित लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंबद्दल म्हणाली की, मी राज ठाकरेंच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर ही पोस्ट केली होती आणि मी आजही ठामपणे सांगेन की राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. त्यांचं नाहीये. कारण मराठी माणसाला कधीही कोणतीही समस्या आली तर पहिलं नाव राज साहेबं किंवा पहिला दरवाजा शिवतिर्थाचा ठोठावला जातो. राज साहेबांकडे जातात. तुम्हाला एखाद्या नेत्याचा इतका विश्वास का वाटतो. कारण ते सातत्याने मराठी माणसांसाठी काम करत आहेत. मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटतो. त्या माणसासाठी मी एक ट्विट केलं. त्यांच्या बाजूने उभे राहिले. त्यासाठी मला अजिबात गैर वाटत नाही. मला त्यांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे.
वर्कफ्रंट...तेजस्विनी पंडितच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. 'तू ही रे', 'येरे येरे पैसा', 'अगं बाई अरेच्चा', 'फॉरेनची पाटलीण' या चित्रपटात ती पाहायला मिळाली आहे. 'मी सिंधुताई सकपाळ' या चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झाले होते. याशिवाय तिने वेब सीरिज आणि मालिकांमध्येही काम केलं आहे. 'रानबाजार', 'अनुराधा' या वेब सीरिजमध्ये ती झळकली आहे. रानबाजार सीरिजमधील कामासाठी ती चर्चेत आली होती.